लुईझिन फालेरो यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेत पाठवण्याची सिद्धता

पक्षांतराच्या वेळी दिले होते आश्‍वासन

लुईझिन फालेरो

पणजी, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – तृणमूल काँग्रेस पक्षाने गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांना राज्यसभेवर पाठवण्याची सिद्धता केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही घोषणा करण्यात आली. तृणमूलच्या गोव्यातील नेत्यांनी लुईझिन फालेरो यांच्या निवडीविषयी आनंद व्यक्त करून गोव्यातील आवाज केंद्रात पोेचणार असल्याचे म्हटले आहे.

लुईझिन फालेरो यांनी २९ सप्टेंबर या दिवशी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीच त्यांना राज्यसभेत पाठवण्याचे आश्‍वासन दिल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन मासांच्या आत पक्षाने त्यांना राज्यसभेत पाठवण्याची सिद्धता चालवली आहे. फालेरो यांनी बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे धन्यवाद मानतांना गोव्यातील आवाज केंद्रात पोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.