ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आई-वडिलांनो, दैवी बालकांना साधनेत विरोध करू नका, तर त्यांच्या साधनेकडे लक्ष द्या !

‘काही दैवी बालकांचा आध्यात्मिक स्तर इतका चांगला असतो की, ती वयाच्या २० – २५ व्या वर्षीही संत होऊ शकतात. काही आई-वडील अशा बालकांना पूर्णवेळ साधना करण्यास विरोध करतात आणि त्यांना मायेतील शिक्षण घ्यायला लावून त्यांचे आयुष्य फुकट घालवतात. साधकाला साधनेत विरोध करण्याइतके महापाप दुसरे नाही. हे लक्षात घेऊन अशा आई-वडिलांनी मुलांची साधना चांगली होण्याकडे लक्ष दिले, तर आई-वडिलांचीही साधना होऊन तेही जीवन-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.५.२०१८)

सनातन संस्थेतील दैवी बालके केवळ ‘पंडित’ नाहीत, तर ‘प्रगल्भ’ साधक आहेत !

परात्पर गुरु डॉ. आठवले

सनातन संस्थेत काही दैवी बालके आहेत. त्यांचे बोलणे आध्यात्मिक स्तरावरील असते. आध्यात्मिक विषयावर बोलतांना त्यांच्या बोलण्यात ‘सगुण-निर्गुण’, ‘आनंद, चैतन्य, शांती’ यांसारखे शब्द असतात. असे शब्द बोलण्यापूर्वी त्यांना थांबून विचार करावा लागत नाही. त्यांचे बोलणे ओघवते असते. ‘ते ऐकत रहावे’, असे वाटते. सर्वसाधारण व्यक्तीच्या दृष्टीकोनातून एखाद्याच्या बोलण्यात असे शब्द येण्यासाठी त्याला नियमित या विषयांशी संबंधित असणे आवश्यक असते. त्या विषयाचा गाढा अभ्यास केला की, ते विषय बुद्धीने कळतात आणि आकलन होतात. त्यानंतर ‘पांडित्य’ येऊन तसे बोलणे होते; परंतु हे बालसाधक केवळ ८ ते १५ वर्षे या वयोगटातील आहेत. त्यांनी ग्रंथांचा गाढा अभ्यास काय; पण वाचनही कधीच केलेले नाही. त्यामुळे त्यांची ही परिभाषा त्यांच्या गेल्या जन्मीच्या साधनेमुळे त्यांच्यात निर्माण झालेली प्रगल्भता दर्शवते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२८.१०.२०२१)

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती

कु. अपाला औंधकर

१. देवतांच्या तत्त्वानुसार शरिरावर विविध रंगांचे दैवी कण आढळणे

‘एकदा भगवान शिवाच्या गीतावर आधारित नृत्य केल्यावर माझे हात अन् तळपाय यांवर सोनेरी आणि चंदेरी या रंगांचे दैवी कण आढळले. एकदा विष्णूच्या गीतावर आधारित नृत्य केल्यावर मोरपंखी आणि सोनेरी या रंगाचे दैवी कण आढळले. त्याविषयी गुरुदेवांनी सांगितले, ‘‘देवतांच्या तत्त्वानुसार हात आणि तळपाय यांवर विविध रंगांचे कण आढळणे’, ही दिव्य अनुभूती आहे.’’

२. नृत्याचा सराव किंवा मुद्राभ्यास करण्यापूर्वी ‘भावप्रयोग’ करण्याचे लक्षात आलेले महत्त्व

मी प्रतिदिन नृत्याचा सराव किंवा मुद्राभ्यास करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी किंवा श्रीकृष्ण, शिव आणि अन्य देवता यांच्याविषयी एक भावप्रयोग करते. त्यानंतरच मी सराव किंवा अभ्यासाला आरंभ करते. ‘माझा भावप्रयोग जेवढा भावपूर्ण होतो, तेवढाच माझा अभ्यास चांगला होऊन मला विविध दैवी अनुभूती येतात. माझा भावप्रयोग भावपूर्ण झाला नसेल, तर त्या दिवशी त्याचा परिणाम माझ्या अभ्यासावर होऊन अभ्यास चांगला होत नाही, तसेच त्या दिवशी मला विशेष अनुभूतीही येत नाहीत. यातून ‘भावप्रयोग करण्याचे महत्त्व किती आहे !’, हे माझ्या लक्षात आले. मी ‘प्रतिदिन भावप्रयोग अधिकाधिक भावपूर्ण कसा होईल !’, यासाठी प्रयत्न करते.

३. ‘केवळ महाविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या स्मरणाने मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो’, असे वाटून कृतज्ञता वाटणे

मी गुरुदेवांचे स्मरण करण्यात पुष्कळ अल्प पडते. माझे गुरु साक्षात् श्रीविष्णुच आहेत.

‘यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।’ – श्रीविष्णुसहस्रनाम

अर्थ : ‘ज्या भगवान विष्णूच्या केवळ स्मरणानेच मनुष्य जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो, अशा श्री विष्णूला मी पुनःपुन्हा नमस्कार करतो.’

‘आपले महाविष्णुस्वरूप गुरुदेव प्रत्येक क्षणी साधकांचाच विचार करतात. महाविष्णुच आपले स्मरण करत असेल, तर आपण कोणत्याच मायेतील भवसागरात (जन्म-मृत्यूच्या बंधनात) अडकू शकत नाही’, असे वाटून माझी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

४. टंकलेखनाची सेवा करतांना टंकलेखनाच्या गतीविषयी कौतुकाचा विचार येणे, नंतर सेवेची गती न्यून झाल्याची जाणीव होणे आणि गुरुदेवांना क्षमायाचना करून सेवा केल्यावर सेवा आधीच्याच गतीने होणे

माझ्याकडे दैवी बालसाधकांना येणार्‍या अनुभूतींचे टंकलेखन करण्याची सेवा आहे. त्यामुळे माझी टंकलेखन करण्याची गती पुष्कळ वाढली आहे. एकदा माझ्या मनात एक क्षण ‘मला आता अधिक गतीने टंकलेखन करता येते’, असा कौतुकाचा विचार आला. दुसर्‍याच क्षणी माझी गती आपोआप न्यून झाली. मी टंकलिखित करत असलेले शब्द चुकू लागले. त्यामुळे चुकीचे शब्द पुसण्यासाठी मला ‘बॅकस्पेस’ ही कळ सतत दाबावी लागत होती. त्या वेळी ‘देव आपल्या मनातील लहानातील लहान अहंचा विचार नष्ट करतो’, याची मला जाणीव झाली. ‘साक्षात् भगवंतामुळे मी सर्वकाही करते. हा देह भगवंताचाच आहे, तरी माझ्या मनात कौतुकाचा विचार का आला ?’, याचे मी चिंतन करून गुरुदेवांची क्षमायाचना केली.

त्यानंतर मी त्यांना प्रार्थना केली, ‘हे भगवंता, ही टंकलेखन करणारी बोटे तुझीच आहेत. मला माझ्या अस्तित्वाचा विसर पडून सेवा करता येऊ दे’ आणि त्यानंतर दुसर्‍या क्षणी पुन्हा माझा टंकलेखनाची गती आधीसारखी झाली.  तेव्हा ‘माझे शरीर हे देवाचेच आहे. मी जी शारीरिक सेवा करते, तीही देवाच्याच कृपेने होते. त्यामुळे ‘मनात अहंचा कोणताच विचार नको’, हे मला या प्रसंगातून शिकायला मिळाले.

५. झोपेत ‘वेळेचा सदुपयोग करता येऊन प्रत्येक क्षणी आपल्याला अपेक्षित अशी सेवा होऊ दे’, अशी गुरुदेवांना प्रार्थना होणे

२४.१०.२०२१ या दिवशी सकाळी झोपेत असतांनाच माझी आपोआप प्रार्थना चालू झाली. ‘हे प.पू. गुरुदेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुमच्या कृपेमुळेच सकाळपासून रात्रीपर्यंत माझा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे ! मला वेळेचा सदुपयोग करता येऊन प्रत्येक क्षणी तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करता येऊ दे’, अशी आपल्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’

– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.१०.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक