वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित् नृत्य यांच्यासह सादर करत असलेल्या भक्तीरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला ‘कीर्तन’ असे म्हणतात आणि हे करणार्या व्यक्तीला ‘कीर्तनकार’ असे म्हटले जाते. सर्व लोकांना ईश्वरभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे. मंदिरात सादर होणारे हे कीर्तन संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी जनसामान्यांसाठी चंद्रभागेच्या काठावर आणून नवी परंपरा चालू केली. या माध्यमातून संतांनी भक्तीमार्ग शिकवला. संत नामदेवांनी वारकरी कीर्तन संस्थेचा पाया घातला.
अशी कीर्तनाची परंपरा असतांना गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात ह.भ.प. इंदोरीकर महाराज, ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्यासारखे कीर्तनकार त्यांच्या कीर्तनात समाजातील पती-पत्नी, इतर नातेवाईक, समाजातील लोक यांच्यावर मोठ्या प्रमाणात हास्यविनोद करून गोष्टी सांगत आहेत. तथापि यातून केवळ कीर्तनाला येणार्या लोकांचे मनोरंजन आणि करमणूक होत असून यात भक्तीचा लवलेशही दिसून येत नाही. यातून कीर्तनकार कीर्तनाचा मुख्य उद्देश विसरत चालले आहेत का ?, असा प्रश्न उपस्थित होतो.
ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी ‘बिग बॉस’ या अश्लाघ्य आणि काही प्रमाणात अश्लील स्वरूपाच्या असणार्या कार्यक्रमात प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. त्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका झाली. त्यांनी अशा कार्यक्रमांत सहभागी होणे, ही त्यांची मोठी चूक होती; कारण अशा कार्यक्रमांत सहभागी होणे, हा कीर्तनकारांचा पिंड नाही. ती चूक लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्या गुरुवर्यांसह सर्वांची क्षमा मागून ‘पुन्हा अशा कार्यक्रमात सहभागी होणार नाही’, असे सांगितले. ह.भ.प. इंदोरीकर महाराज आणि ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनातून अध्यात्म अन् भक्ती यांविषयी काहीच बोध न होता केवळ करमणूक होते.
ह.भ.प. बंडातात्या कराडकर, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर, ह.भ.प. चारुदत्त आफळे, ह.भ.प. पू. निवृत्ती महाराज वक्ते यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले. त्यांचा आदर्श घेऊन कीर्तनकारांनी स्वतःच्या मुख्य उद्देशापासून विचलित न होता कीर्तनसेवा द्यावी, हीच वारकर्यांची अपेक्षा !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई