सतत सेवारत रहाणारे, गुरूंप्रती श्रद्धा असणारे आणि संशोधनाची आवड असणारे रामनाथी आश्रमातील श्री. धनंजय रमेश कर्वे (वय ५३ वर्षे) !

उद्या कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी (१४.११.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. धनंजय कर्वे यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची पत्नी सौ. मधुरा कर्वे यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. धनंजय रमेश कर्वे यांना ५३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. धनंजय कर्वे

१. सर्वांशी जवळीक साधणे

‘श्री. धनंजय कर्वे यांचे वागणे आणि बोलणे यांमध्ये पुष्कळ सहजता आहे. समाजातील व्यक्ती असो कि साधक असो, पहिल्या भेटीतच त्यांची सर्वांशी जवळीक होते.

२. मनमिळाऊ स्वभाव

साधनेत येण्यापूर्वी अनेक वर्षांपासून श्री. धनंजय कर्वे यांचा ‘सिव्हिल रिनोव्हेशन’चा (बांधकामाशी संबधित) व्यवसाय होता, तसेच त्यांचे स्वतःचे ‘हार्डवेअर’चे दुकानही होते. व्यवसायानिमित्त श्री. कर्वे यांच्याकडे पूर्वी १५-२० कामगार काम करत होते. त्यांतील काहीजण आजही त्यांना विचारतात, ‘‘साहेब, काही काम असेल तर सांगा.’’ श्री. कर्वे यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि माणसे जोडून ठेवण्याची हातोटी यांमुळे आजही लोक त्यांनी करून दिलेल्या बांधकामांसंदर्भातील कामांची आठवण काढतात आणि कौतुक करतात.

सौ. मधुरा कर्वे

३. चित्रकलेची आवड असून हस्ताक्षरही सुंदर असणे

श्री. कर्वे यांनी ‘आर्ट टिचर डिप्लोमा’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यांना चित्रकलेची पुष्कळ आवड होती. त्यांचे हस्ताक्षर अतिशय सुंदर आहे. ‘स्वभावदोष सारणी असो कि सेवांची सूत्रे असो, त्यांचे प्रत्येक लिखाण इतके नीटनेटके आणि सुंदर आहे की, ‘त्याकडे पहात रहावे’, असे वाटते.

४. पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणे

वर्ष २०१२ पासून मला (पत्नीला) संधीवाताचा त्रास चालू झाल्याने मी शारीरिकदृष्ट्या अतिशय कमकुवत झाले होते. माझ्या हाता-पायांत फारशी शक्ती नसल्याने मला घरातील बहुतांश कामे करता येत नसत. माझ्या हातांमध्ये जेमतेम संगणकाचा माऊस आणि ‘कीबोर्ड’ हाताळण्याची शक्ती होती. त्यामुळे ते मला म्हणायचे, ‘‘तू घरकाम करू नकोस. तुला शारीरिक श्रम पेलणार नाहीत. मी घरातील सर्व कामे करतो. तुझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनांची संरचना करण्याची सेवा आहे. तुझ्यात कौशल्य आहे. तू सेवेला वेळ देऊन चांगली सेवा कर.’’ त्यामुळे घरातील सर्व कामे तेच करत होते. एवढे सर्व करून कधीही त्यांनी ‘‘मी थकलो, जरा पडतो’’, असे म्हटल्याचे मला आठवत नाही. ते कायम उत्साही आणि आनंदी असतात.

५. पत्नीला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे

पूर्वी मला साधकांकडून होणार्‍या चुकांमुळे पुष्कळ मानसिक त्रास होत असे. त्या वेळी त्यांनी मला दृष्टीकोन दिला, ‘कालांतराने त्या साधकांत पालट होईल; पण तुझे काय ? त्यांच्या दोषांचे चिंतन करत राहिल्याने तुझ्या मनावर मात्र त्या दोषांचा संस्कार होत राहील. त्यापेक्षा तू त्यांना समजून घे. तू तुझे मन निर्मळ ठेव. आपण केवळ स्वतःमध्ये पालट करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आपण इतरांमध्ये पालट करू शकत नाही.’’ त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर मला साधकांप्रती प्रेम वाटून त्यांचे गुण दिसू लागले आणि मला साधकांप्रती कृतज्ञता वाटू लागली.

६. इतरांना साहाय्य करणे

श्री. कर्वे जसे मला साधनेत साहाय्य करतात, तसेच ते इतरांनाही करतात.

श्री. राज कर्वे

७. सतत सेवारत रहाणे

ते घरातील सर्व दायित्व सांभाळून प्रसारात दिवसभर सेवारत असायचे. सेवा संपवून रात्री घरी आल्यावर ते स्वयंपाकात मला साहाय्य करायचे. तेव्हा आमचा १५ वर्षांचा मुलगा राज (आताचे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चे ‘ज्योतिष विशारद’ श्री. राज कर्वे) रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत होता. त्यांनी राजकडून कधीही अपेक्षा केली नाही की, त्याने घरी राहून आम्हाला साहाय्य करावे.

८. श्री गुरूंप्रतीचा भाव आणि श्रद्धा यांमुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाणे

वर्ष २०१४ मध्ये आम्ही पुणे येथून गोव्यातील फोंडा येथे वास्तव्यास आलो. काही मासांतच आम्हाला काही कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. तेव्हाही ते डगमगले नाहीत. ते म्हणाले, ‘‘साधना करत राहूया. श्रीगुरूंचे चरण धरून ठेवूया. सर्वकाही चांगले होईल.’’ श्री. कर्वे यांचा श्रीगुरूंप्रती असलेला भाव आणि श्रद्धा यांच्या बळावर आम्ही कर्वे कुटुंबीय कठीण प्रसंगांतून तरलो.

९. संशोधक वृत्ती

वर्ष २०१५ मध्ये श्री. कर्वे पुण्याला जाऊन लोलकविद्या शिकून आले. त्यांनी मलाही लोलकविद्या शिकवली. त्यांनी लोलक विद्येद्वारे विविध आजारांवर नामजपादी उपाय शोधून काढले. त्यानंतर त्यांनी गृहवास्तूशास्त्राचा प्राथमिक अभ्यास केला. त्यांची भगवान श्रीकृष्णावर श्रद्धा आहे. ते श्रीकृष्णाशी मनातून बोलतात. श्री. कर्वे यांनी वर्ष २०२० मध्ये श्रीकृष्णाला प्रश्‍न विचारून वास्तूदोष निवारणाची सोपी अन् बिन व्ययाची उपायपद्धती शोधून काढली, तसेच वास्तूविक्री यंत्राचीही निर्मिती केली. त्यांना अशा प्रकारे नवनवीन संशोधन करण्याचा ध्यास आहे. ते सध्या वास्तूविषयक सूत्रांचा अभ्यास करण्याची सेवा करत आहेत. वास्तूच्या संदर्भातील पुस्तकांचा अभ्यास करण्यासह ते श्रीकृष्णाला प्रश्‍न विचारून सूक्ष्मातून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात.

आताच्या कलियुगात सद्गुणी, सद्वर्तनी, साधना करणारा आणि पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारा पती मिळणे महत्भाग्याचे आहे. यासाठी मी ईश्‍वरचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.१०.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक