१. पूर्णवेळ साधना करण्याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून दिशा देणे
‘मी पूर्णवेळ साधना करण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ शंका आणि प्रश्न होते. ‘माझ्या या निर्णयावर कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येईल ?’, असे मला वाटत होते; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने जे ठरले होते, ते कार्यान्वित करण्याची दिशाही त्यांनीच सूक्ष्मातून मला दिली आणि त्यांनी ते निर्विघ्नपणे पूर्णही करवून घेतले. परात्पर गुरुदेव, आपण माझे आई-वडील (सौ. सविता (वय ७२ वर्षे आणि श्री. नाथुसिंह पंवार वय ७२ वर्षे यांना) आणि घरातील अन्य सदस्य यांना आपल्या चरणी स्थान दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.
२. ‘पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय आई-वडील रामनाथी आश्रमात आल्यावरच त्यांना सांगायचा’, असे ठरवणे
रामनाथी आश्रमात येऊन मला २ आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला होता. मला वाटत होते, ‘मी आता पूर्णवेळ साधना करणार आहे’, हे घरी सांगण्याची वेळ आली आहे.’ तेव्हा तेव्हा एका साधिकेने सांगितले, ‘‘आई-वडिलांना प्रथम आश्रमात बोलव आणि नंतर त्यांना हा निर्णय सांग.’’ जेव्हा मी घरी संपर्क करून आई-वडिलांना आश्रमात येण्याविषयी सांगितले, तेव्हा तेसुद्धा आश्रमात येण्यासाठी लगेचच सिद्ध झाले आणि सुखरूप आश्रमात पोचले.
३. आई-वडिलांना रामनाथी आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे
३ अ. आश्रमातील सौंदर्य पाहून तिथे ईश्वराचा वास असल्याचे आई-वडिलांना जाणवणे, ‘हे ईश्वराचे घर असल्याने इथे सगळे चांगलेच असणार’, असे वडिलांनी सांगणे आणि त्यांचे बोलणे ऐकून भावजागृती होणे : जेव्हा आई-वडिलांचे परात्पर गुरु डॉक्टरांच्या या विष्णुलोकात आगमन झाले, तेव्हा आश्रमाचे सौंदर्य पाहूनच त्यांना येथे ईश्वराचा वास असल्याचे जाणवले. मला सूक्ष्मातून ईश्वराने सांगितले, ‘ते जे शोधत आहेत, ते त्यांना मिळाले आहे.’ आम्ही आश्रमातील खोलीत गेल्यावर तेथील सर्व व्यवस्था पाहून आई म्हणाली, ‘‘इथे आवश्यक त्या सर्व वस्तू उपलब्ध आहेत. इथे सगळेच नियोजन किती चांगल्या प्रकारे केले आहे ना !’’ तेव्हा वडिलांनी उत्तर दिले, ‘‘चांगले का असणार नाही ? हे तर भगवंताचे घर आहे.’’ त्यांचे शब्द ऐकून माझी भावजागृती झाली. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेचा आपण विचारच काय; पण कल्पनाही करू शकत नाही.
३ आ. सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांच्या भेटीच्या वेळी त्यांनी आई-वडिलांना वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद दिल्याचे पू. सौरभ जोशी यांच्या आई-वडिलांनी सांगणे : आई-वडील आश्रमातील सर्व संतांकडे आदराने आणि सन्मानाने पहात होते आणि बोलत होते. पू. सौरभदादांना (सनातनचे विकलांग संत पू. सौरभ जोशी यांना) भेटून त्यांना पुष्कळ आनंद झाला. माझे वडील पू. दादांच्या चरणांना पुनःपुन्हा स्पर्श करत होते. तेव्हा पू. सौरभदादा हसू लागले. नंतर मला वडील सांगत होते, ‘‘ते मला हास्यातून सांगत होते की, ‘तू तर असाच आहेस.’’ यातून २ गोष्टी माझ्या लक्षात आल्या. पू. सौरभदादांनी बाबांना ‘स्व’च्या विचाराची जाणीव करून दिली. ते त्यांच्या अहंच्या लयासाठी आवश्यक होते आणि ते साधनेच्या पुढील टप्प्याचे मार्गदर्शन होते. दुसरी गोष्ट म्हणजे वडील तेव्हा ‘स्व’च्या विचारात नसल्यामुळे संतानी जे व्यक्त केले, ते त्यांना शरणागतभावाने स्वीकारता आले. माझी आई पू. सौरभदादांच्या डोक्यावरून हात फिरवत होती. तेव्हा पू. दादांनी तिचे दोन्ही हात धरून त्यांच्या डाव्या कुशीजवळ धरले. जणू काही ते म्हणत आहेत, ‘तू जिवाला (माझ्याशी म्हणजे) शिवाशी एकरूप कर.’ पू. दादांच्या आई-वडिलांनी सांगितले, ‘‘पू. सौरभदादा असा प्रतिसाद सर्वांना देत नाहीत. तुम्हा दोघांना त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद दिला आहे.’’
३ इ. ‘प्रत्येक कृती भगवान विष्णूच्या कृपेने होत आहे’, असे जाणवून प्रथमच वडिलांच्या तोंडवळ्यावर आनंद, शरणागतभाव आणि तेज दिसणे : आश्रमात आल्यावर माझ्या वडिलांना ‘प्रत्येक कृती भगवान विष्णूच्या कृपेने होत आहे’, असे जाणवले. त्यांच्या तोंडवळ्यावर एवढा आनंद, शरणागतभाव आणि तेज यापूर्वी मी कधी पाहिले नव्हते. ‘स्वतःकडे न्यूनपणा घेणे, सकारात्मक रहाणे, सरळपणा, सहजपणा’ हे त्यांच्यातील गुण आश्रमाच्या चैतन्यामुळे उघड होत आहेत’, असे मला वाटले.
३ ई. वडिलांनी मुलीला परात्पर गुरु डॉक्टरांचे सतत स्मरण करण्याविषयी सांगणे : माझ्या वडिलांनी आश्रमाची सर्व व्यवस्था आणि चैतन्य ग्रहण केले. दुसर्या दिवशी ते मला म्हणाले, ‘‘ तू परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेला नामजप करत जा आणि त्यांचे ध्यान करत जा. तू परात्पर गुरु डॉक्टरांचेच स्मरण करत जा. त्यांच्या कृपेने सगळे काही चांगले होईल.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञतेव्यतिरिक्त दुसरे काहीच सुचत नव्हते. तेव्हा ‘माझ्याकडून साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना माध्यम बनवून येथे बोलावले आहे’, असे मला जाणवले.
३ उ. मुलगी पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहाणार असल्याचे समजल्यावरही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे वडिलांनी ते सहजपणे स्वीकारणे : त्यानंतर मी वडिलांना सांगितले, ‘‘मी आता आश्रमातच रहाणार आहे.’’ तेव्हा मी पूर्णवेळ साधना करणार असल्याचे ऐकूनही त्यांना काहीसुद्धा वाटले नाही. ‘त्यांना सगळे सहजपणे स्वीकारता येईल’, याची सिद्धता परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने झाली. आश्रमातून जातांना आई-वडील दोघेही आनंद आणि भाव घेऊन गेले.
४. आश्रमातून घरी गेल्यावर आई-वडिलांमध्ये झालेले पालट
४ अ. मुलगी पूर्णवेळ साधना करणार असल्याच्या निर्णयाला नातेवाइकांनी विरोध करूनही आई-वडिलांनी त्यांना योग्य उत्तर देणे : मी पूर्णवेळ साधना करणार असल्याचे घरी समजल्यावर माझी आत्या, काका, आजी सर्वजण आई-वडिलांना पुष्कळ बोलले. ते संस्था आणि आश्रम यांच्याविषयी पुष्कळ काही (विरोधात) बोलले. तेव्हा आई-वडिलांनी त्यांना धैर्य आणि विवेकाने योग्य उत्तरे दिली. त्यांनी सगळ्यांना आश्वस्त केले की, ‘रूचि जिथे आहे, तिथे ती चांगली आहे.’ त्या वेळी ‘मी मुलीला अत्यंत योग्य ठिकाणी पाठवले असून खरेतर या आधीच तिथे पाठवायला हवे होते’, असाच त्यांचा भाव होता.
४ आ. वडिलांशी बोलतांना ‘साधकाशी बोलत आहे’, असे वाटणे : जेव्हा वडील माझ्याशी बोलतात, त्या वेळी माझे क्षेमकुशल विचारून ते मला ‘‘तुझी साधना कशी चालली आहे ?’’, असे विचारतात. त्यांनी सांगितले, ‘‘तू प्रयत्न करत रहा. घरची काळजी करू नकोस. तू तुझ्या साधनेकडे लक्ष दे.’’ त्यांच्याशी बोलतांना मला प्रत्येक वेळी नवीन शिकायला मिळते आणि ‘मी एका साधकाशीच बोलत आहे’, असे मला जाणवते.
४ इ. आश्रमात येऊन गेल्यापासून आई-वडिलांच्या साधनेत परिवर्तन होणे : एके दिवशी माझे वडील सांगत होते, ‘‘माझा नामजप होतो; परंतु तो भावपूर्ण कसा करू ? आश्रमात जी प्रार्थना करतात, ती तू मला पाठवतेस का ?’’ त्यांच्यात ही शिकण्याची तळमळ आणि भाव केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्यामुळे निर्माण झाला आहे. त्यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकण्याची ओढ लागली आहे. आई-वडील नियमित ग्रंथवाचन करतात. ते ग्रंथात सांगितल्यानुसार नामजप आणि कृती करण्याचा प्रयत्न करतात. यापूर्वी वडील वेगवेगळ्या प्रकारचे नामजप आणि गायत्री मंत्र करायचे; परंतु आश्रमातून घरी गेल्यानंतर नियमित सत्संगाला जाण्यामुळे आणि ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथाचे वाचन केल्यानंतर त्यांच्याकडून ते पूर्वी करत असलेले गायत्री मंत्राचे पठण आपोआप बंद झाले आहे.
४ ई. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेकाका यांच्या सहवासामुळे प्रेरित होऊन आई-वडिलांनी साप्ताहिक सत्संगाला जाण्यास प्रारंभ करणे : आश्रमातून घरी गेल्यानंतर आई-वडिलांना चांगले सत्संग लाभत आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची भेट झाल्यानंतर आई-वडिलांना पुष्कळ आनंद झाला. त्यानंतर त्यांनी नियमित साप्ताहिक सत्संगाला जाणे आरंभ केले. ते घरात बहिणीलाही सत्संगात जाण्याविषयी सांगतात.
४ उ. मुलीविषयी कोणतीही अपेक्षा नसणे : जेव्हा एका साधिकेने त्यांना विचारले, ‘रूचि आता सेवेसाठी जयपूरला येणार कि अन्य केंद्रात जाणार ?’’ तेव्हा आई-वडिलांनी सांगितले, ‘‘आता देव तिला जेथे ठेवेल, तेथे तिला रहायचे आहे.’’
४ ऊ. आई-वडिलांची सेवा करण्याची तळमळ : एकदा साप्ताहिक सत्संगात गणेशोत्सवासाठी वितरणकक्ष (स्टॉल) लावण्याचा विषय निघाल्यावर आईने त्वरित सांगितले, ‘‘आमच्या घराजवळ असलेल्या गणेश मंदिरात आम्ही वितरणकक्ष (स्टॉल) लावू.’’ सेवेच्या एक दिवस आधी मी वडिलांना विचारले, ‘‘सकाळी आपल्या घरात गणपतीची पूजा असते आणि ती तुम्हीच करता. तर मग तुम्ही सेवा आणि पूजा या दोन्हींचे नियोजन कसे करणार ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘घरातील पूजा अल्पवेळात करून जाईन; कारण सेवासुद्धा एक प्रकारची पूजाच आहे.’’ त्या दोघांनी वितरणकक्षावर निरपेक्ष भावाने सेवा केली. वडिलांनी सांगितले, ‘‘सेवा करतांना माझे श्री गणेशाचे नामस्मरण अखंड होत होते. परात्पर गुरु डॉक्टरांनी तुझ्या आईला माध्यम करून या सेवेचा विचार दिला आणि त्यांनीच ही सेवा करवून घेतली.’’
४ ए. गुरुपौर्णिमा महोत्सवात २ साधकांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर वडिलांना भावाश्रू येणे : गुरुपौर्णिमा महोत्सवात वडिलांची सेवेची तत्परता आणि तळमळ दिसून आली. माझे वडील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात अत्यंत सहजभावात आणि आनंदात असल्याचे जाणवत होते. जेव्हा तेथे २ साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले आणि त्यांचा सत्कार होत होता, तेव्हा वडिलांना भावाश्रू येऊ लागले.
५. आई-वडिलांना रामनाथी आश्रमातच रहावेसे वाटणे
रामनाथी आश्रम पाहिल्यानंतर आई-वडिलांनाही ‘रामनाथी आश्रमातच रहावे’, असे वाटत होते.
६. कृतज्ञता
परात्पर गुरु डॉक्टर, आपणच मला अशा आई-वडिलांच्या घरात जन्म दिला, याबद्दल मी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
मला हे लिखाण करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताच वाटत आहे. नारायणस्वरूप गुरुदेव केवळ एका जिवाला मोक्षापर्यंत घेऊन जात नाहीत, तर ते साधकाचे संपूर्ण कुटुंब आणि त्याचे पूर्वज यांनासुद्धा मुक्त करतात आणि त्याची अनुभूतीही देतात. भवसागर पार करवून देणार्या पालनहार परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. रूचि पंवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |