मेणवली (जिल्हा सातारा) येथे स्वरक्षण प्रशिक्षण शिबीर पार पडले !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई विभागाचा उपक्रम !

मेणवली (तालुका वाई) येथे स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतांना प्रशिक्षक आणि त्यात सहभागी प्रशिक्षणार्थी

सातारा, १० नोव्हेंबर (वार्ता.) – वाई तालुक्यातील मेणवली येथे दीपावलीच्या निमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आणि हिंदु जनजागृती समितीच्या साहाय्याने स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गावातील ४० हून अधिक युवक आणि युवती सहभागी झाले होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराला प्रारंभ झाला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री सूरज मांढरे, विशाल निंबाळकर, रोहन निंबाळकर, अभि चौधरी, गणेश गायकवाड उपस्थित होते.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराची आवश्यकता स्पष्ट केली. हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वैभव क्षीरसागर आणि निखिल कदम यांनी उपस्थितांना प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली.

क्षणचित्रे

१. मेणवली येथील एक महिला पोलीसमित्रही या शिबिरामध्ये सहभागी झाल्या होत्या.  शिबिराचा उद्देश जाणून घेऊन त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच स्वत: प्रशिक्षण घेतले. ‘भविष्यात हा उपक्रम सातारा पोलीस दलाच्या माध्यमातून समाजासाठी राबवू शकण्याविषयी सातारा पोलीस दलाशी बोलून घेऊ’, असे त्यांनी सांगितले.

२. या वेळी प्रशिक्षण शिबिरातील सूरज मांढरे यांनी उपस्थितांना सनातन संस्था निर्मित २० ‘प्रार्थना’ ग्रंथ भेट दिले.

अनुभूती

दीपोत्सवाच्या आरंभी वातावरण ढगाळ होते. पाऊस येण्याची शक्यता वाटत होती; मात्र धर्मप्रेमींनी ग्रामदेवता श्री वाघेश्वरीदेवीला सामूहिक प्रार्थना केली. त्यामुळे पाऊस न पडता दीपोत्सव निर्विघ्नपणे पार पडला.

धर्मशिक्षणवर्गातून प्रेरणा घेऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मेणवली घाटावर दीपोत्सवाचे आयोजन !

मेणवली येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षणवर्ग घेण्यात येतो. दीपावलीचे औचित्य साधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मेणवली येथील घाटावर दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी ग्रामपंचायत सदस्यांच्या शुभहस्ते ग्रामदेवता श्री वाघेश्वरीदेवीचे पूजन करण्यात आले. या दीपोत्सवामध्ये २०० हून अधिक ग्रामस्थांनी ५०० हून अधिक दीप प्रज्वलित केले. या वेळी धर्मशिक्षणवर्गातील सूरज मांढरे आणि रोहन निंबाळकर यांनी ‘दीपोत्सवाचे महत्व आणि धर्मशिक्षणवर्गाची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना धर्मशिक्षणवर्गात सहभागी होण्याचे आवाहन केले.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक