पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एम्.एन्.जी.एल्.) आस्थापनाला गॅस वाहिन्यांच्या विस्तारासाठी आवश्यक ते साहाय्य देऊनही त्यांच्याकडून अपेक्षित कामे होत नाहीत. एम्.एन्.जी.एल्. पूर्ण कार्यक्षमतेने काम करत नसून त्यांच्या कामाचा वेग संथ आहे, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील १० लाख कुटुंबांपैकी केवळ साडेतीन लाख कुटुंबांना पाईपने गॅस उपलब्ध होतो. त्यामुळे उर्वरित कुटुंबांना ‘पाईप गॅस’ कधी मिळणार ? असा प्रश्नही बापट यांनी उपस्थित केला. आस्थापनाने प्रशिक्षित ‘प्लंबर’ (नळजोडणी करणारा) मिळत नसल्याची तक्रार केली होती; मात्र आस्थापनाला ‘प्लंबर’चा प्रश्न सोडवता येत नसेल, तर त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, असेही बापट यांनी सांगितले.