दोषारोप निश्चिती करतांना प्रकरणातील सर्व संशयितांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करावे ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण

कोल्हापूर, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – डॉ. दाभोलकर आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणांतील खटल्यात संशयितांवर दोषारोप निश्चिती करतांना सर्व संशयितांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्याचप्रकारे कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित करतांना या प्रकरणात विविध कारागृहांत असलेल्या सर्व संशयितांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केली. कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील नियमित सुनावणीच्या प्रसंगी त्यांनी ही मागणी केली.

ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्यासमोर चालू आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे.