कोल्हापूर – कार्तिक मासात दीपावलीच्या पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मी मंदिरातील नित्योपचारात पालट होतो. पुढे येणार्या पौर्णिमेपर्यंत १५ दिवस हा पालट असतो. या कालावधीत मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वांत उंचावर कापूर लावतात, त्यास ‘काकडा’ म्हणतात. कार्तिक मासात दीपदानाची धार्मिक परंपरा आहे. आकाशासाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर त्या ठिकाणी देवतेचा वास असतो. या भावनेतूनच काकडा प्रज्वलित करणेची परंपरा चालू झाली.
पहाटे २ वाजता मशालीच्या मंद उजेडात काकडा प्रज्वलित करतात. मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे हा काकडा फिरवून पितळी उंबर्यावर कापूर लावून मुख्य गर्भगृह उघडले जाते. त्यानंतर देवीची काकडआरती होते. रात्री १०.१५ वाजता होणारी शेजारती रात्री ९.१५ वाजता होते. प्रत्येक शुक्रवारी रात्री ९.३० वाजता होणारी पालखी परिक्रमा रात्री ८.४५ वाजता होते. कडाक्याच्या बोचर्या थंडीत पहाटे हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणे आणि तो प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणे ही सेवा श्री महालक्ष्मीदेवीवर श्रद्धा असलेल्या निस्सीम भक्तीमुळेच भाविक करू शकतात. त्रिपुरी पौर्णिमेला पालखी सोहळ्याच्या मंदिरातील दीपमाळा प्रज्वलित करतात.