पू. सिद्धेश्वर स्वामीजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बोलवाड-टाकळी (जिल्हा सांगली) येथील ‘श्री गुरुदेव तपोवनात’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार !

‘श्री गुरुदेव तपोवना’त सनातनचा बालसाधक कु. अर्जुन पुजारी याचा सत्कार करतांना उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर

मिरज, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – बोलवाड-टाकळी येथील ‘श्री गुरुदेव तपोवनात’ विश्वसंत ज्ञानयोगी पू. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ५ नोव्हेंबर या दिवशी विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पुणे येथील उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर आणि रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी पोपट ओमासे यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आले. सोहळ्याच्या प्रसंगी पू. शिवदेव स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षण घेणार्‍या योगपटूंनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली. अधिवक्ता सचिन हांडीफोड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आरोग्य क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. श्रीधर लीपेकर, डॉ. शिरीष चव्हाण, डॉ. उदय पाटील, डॉ. कुणाल पाटील यांना, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले, मुंबई येथील कर साहाय्यक श्री. प्रमोद मगदूम, स्पर्धा परीक्षेत यश मिळवणारे श्री. राहुल माळी, नौकानयन आणि आपत्काळात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देणारे सांगलीचे श्री. दत्ता पाटील, द्राक्ष शेतीसाठी श्री. अरविंद गुळवणी, तसेच अन्यांचे याप्रसंगी सत्कार करण्यात आले. मुख्य अतिथी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी विविध उदाहरणे देऊन संत आणि गुरु समाज घडवण्यासाठी कशा पद्धतीने योगदान देत आहेत ?, हे सांगितले. पू. शिवदेव स्वामीजी यांनी योगासने, प्राणायाम यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व उपस्थितांना समजावून सांगून ‘त्याग केल्याविना इच्छित कार्य पूर्ण होऊ शकत नाही’, असे सांगितले.

विशेष

१. सर्वांचा सत्कार धार्मिक पद्धतीने मंत्रोच्चार करून आणि फुले वाहून पू. शिवदेव स्वामीजी यांनी स्वतः केला.

२. सनातनचा बालसाधक कु. अर्जुन गिरीश पुजारी (वय ११ वर्षे) याचा विविध ठिकाणी झालेल्या योगासन स्पर्धेतील उल्लेखनीय यशासाठी ‘योगरत्न’ पुरस्कार देऊन उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.