प.पू. काणे महाराज यांची चतुर्थ पुण्यतिथी !
पुणे – प.पू. काणे महाराजांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त ६ नोव्हेंबर या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव-पुणे येथे रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. श्रीपाद ठुसे आणि सौ. शीतल ठुसे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला. यानंतर भक्तांनी २ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा नामजप केला. श्री. शशिकांत ठुसे काकांनी नामजपाचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाला प.पू. भक्तराज महाराजांचे पुत्र श्री. सुनील कसरेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
श्री. प्रमोद केशव बेलरे (पुणे) आणि श्री. रणजीत भगत (जुन्नर, जिल्हा पुणे) यांनी प.पू. काणे महाराजांच्या संदर्भातील आठवणी सांगितल्या. तसेच प.पू. काणे महाराजांच्या अंगी असलेल्या तत्वनिष्ठता या गुणाचे महत्त्व एका प्रसंगाच्या आधारे सांगितले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
१. श्री. बेहेरे – प.पू. काणे महाराज ज्या वेळी आमच्याकडे रहात होते, तेव्हा ते भूमीवर चटई टाकून झोपत असत. ‘आम्ही गादीवर झोपा’, असे सांगितले, तर ते सांगत ‘मी ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी माणसाने गादीवर झोपू नये.’
२. श्री. रणजित भगत – प.पू. काणे महाराजांनी मला तुळस लागवड करायला आणि नामजप करायला सांगितले. कारण तुळस ही सात्त्विक वनस्पती आहे आणि तिच्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो.