इंग्लड येथील ‘क्यूएस् रँकिंग’ या आस्थापनाकडून प्रतिवर्षी जगभरातील विद्यापिठे आणि शैक्षणिक संस्था यांची गुणवत्ता अन् दर्जा याविषयी क्रमवारी घोषित केली जाते. या आस्थापनाने यावर्षी घोषित केलेल्या क्रमवारीत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), मुंबई ही देशात प्रथम स्थानी आहे; मात्र हीच संस्था आशियातील विद्यापिठांमध्ये ४२ व्या स्थानी आहे. मागील वर्षी ‘आयआयटी, मुंबई’ ३७ व्या स्थानी होती. म्हणजे ५ क्रमांकाने आयआयटीची घसरण झाली आहे. यामध्ये आयआयटीला पी.एच्.डी.धारक प्राध्यापकांसाठी १०० गुण, संशोधनाच्या कागदपत्रांसाठी ८४.२ गुण, कर्मचारी सुविधेसाठी ९६ गुण, प्राध्यापकांच्या कार्यक्षमतेसाठी २३, तर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संख्येसाठी ४.४ गुण देण्यात आले आहेत. या गुणतालिकेवरून उच्चशिक्षित प्राध्यापकांसाठी अधिक गुण, तर त्यांची कार्यक्षमता, बाहेरील विद्यार्थी संख्येसाठी सर्वांत अल्प गुण आहेत. जगातील सोडाच आशियातील विद्यापिठांच्या क्रमवारीत पहिल्या ५ संस्थांमध्ये स्थान नसणे, ही भारतासाठी नामुष्कीची गोष्ट आहे.
आयआयटीमध्ये निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. प्रवेशपरीक्षा आणि नंतर मुलाखत यांमध्ये उत्तीर्ण झाल्यावर अभियांत्रिकीच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होतो; मात्र त्यांची काठीण्य पातळी अधिक असते. येथे अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या तुलनेत अधिक सखोल अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यासमवेत प्रायोगिक भागावर अधिक भर दिला जातो. सध्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘दादा’ आस्थापन ‘गूगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिच्चाई हे ‘आयआयटी’तूनच पदवीधर झालेले आहेत. परिणामी जगातील अनेक देशांतील विद्यार्थ्यांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश घ्यावासा वाटणे अपेक्षित होते; मात्र वास्तवात तसे नाही. बहुतांश हुशार भारतीय विद्यार्थ्यांचा ओढाही परदेशी विद्यापिठांमध्ये शिक्षण घेऊन तेथेच नोकरीनिमित्त स्थायिक होण्याकडे आहे.
खरे तर भारत हा जगातील विविध तंत्रज्ञानाचे मूळ असणारा देश आहे. काही तंत्रज्ञानाचे ज्ञान अथवा विज्ञान हे आज सुप्त अवस्थेत आहे. ते वेदांमध्ये, तसेच काही प्रमाणात सांकेतिक भाषेतही आहे. त्याची उकल करणे आवश्यक आहे. त्याविषयी भारतीय विद्यापिठांमध्ये शिक्षण दिले जाणे आवश्यक आहे. अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. त्यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल.