शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचा निकाल घोषित

उद्या ८ नोव्हेंबरला होणार पुरस्कार वितरण सोहळा

सिंधुदुर्ग – युवकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्याचे विचार रुजावे, देव, देश आणि धर्म यांसाठी इतिहासातून प्रेरणा घेऊन युवकांनी पुढे यावे, यासाठी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने २ नोव्हेंबर या दिवशी कुडाळ शहर मर्यादित ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’अशा जयघोषात फेरी काढून युवकांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी पारंपरिक वेषात उपस्थित होते. या स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून प्रथक क्रमांक नाबरवाडी येथील ‘दुर्गवेडे’ संघटनेच्या ‘सिंहगड’ प्रतिकृतीला, द्वितीय क्रमांक हिंदु कॉलनी येथील ‘ओमसाई मित्रमंडळाच्या ‘राजगड’ प्रतिकृतीला, तर तृतीय क्रमांक गुढीपूर येथील साईप्रसाद मसगे यांच्या ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याच्या प्रतिकृतीला मिळाला.

केळबाई युवक मित्रमंडळाने बनवलेली प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती

यासह उत्तेजनार्थ पुरस्कार, तसेच उत्कृष्ट रचना, उत्कृष्ट मांडणी, उत्कृष्ट वेशभूषा, विशेष प्रयत्न आदी विविध पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ८ नोव्हेंबर या दिवशी (वर्ष १६६३ याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज तळकोकणातील कुडाळ प्रांतात आले होते.) विजेत्या स्पर्धकांच्या प्रतिकृती असलेल्या ठिकाणी जाऊन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत २१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, तर परीक्षक म्हणून श्री. दिगंबर सखाराम मोर्ये, श्री. मुकुंद गोविंद परब आणि श्री. संदीप चिऊलकर यांनी काम पाहिले, असे ‘शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्या’ वतीने सांगण्यात आले.