हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला !

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदू जागृत होत असल्यामुळेच हिंदुद्वेष्ट्यांच्या पोटात दुखत आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी धर्मरक्षणाचे कार्य वैध मार्गाने अधिक जोमाने करणे आवश्यक आहे ! – संपादक

मुंबई – हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ या मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला. ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘एले इंडिया’ मासिकात लेखक रोमन बेग यांचा ‘पॉलिटिक्स ऑफ शेड्स अँड सिल्हूट्स-इंडियाज् लेटेस्ट फॅशन ट्रेंड’ हा लेख प्रकाशित करण्यात आला होता. या लेखात धर्मरक्षणासाठी आवाज उठवणार्‍या हिंदूंचा उपहास करण्यात आला होता. ‘ऑप इंडिया’या वृत्तसंकेतस्थळाने हे वृत्त दिले आहे.

‘ऑप इंडिया’तील वृत्तानुसार,

१. रोमन बेग यांचा इतिहास पडताळला असता त्यांनी शरजील इमाम याचे समर्थन केल्याचे दिसून येते. या वादग्रस्त लेखाविषयी गदारोळ झाल्यानंतर ‘एले इंडिया’च्या डिजिटल संपादिका एनी निजामी अहमदी यांनी त्वरित त्यांचे स्वतःचे प्रसारमाध्यमावरील खाते ‘लॉक’ केले.

२. या लेखासाठी ‘एले इंडिया’ने हिंदुविरोधी मानसिकता असणार्‍या कलाकाराकडूनच चित्रण करून घेतले होते. या १९ वर्षीय कलाकाराचे ‘युजर नेम’ (वापरकर्त्याचे नाव) ‘Lord_VoldeMaut’ असे आहे. ‘एले इंडिया’ने या कलाकाराच्या कलाकृतींचा वापर त्याला न विचारताच केला होता. त्यामुळे तोही संतप्त झाला आहे. हा कलाकार हिंदूंच्या विरोधातील कलाकृतींसाठी भगव्या रंगाचा वापर करतो.