धर्मावर श्रद्धा ठेवणारे देश जलद गतीने प्रगती करतात !

‘धर्म स्वतःच्या नैतिक मूल्यांवर खोलवर प्रभाव टाकतो. तो आमच्या राजकीय विचारांवरही प्रभाव टाकतो. ‘केंब्रिज विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, धर्म हा अर्थव्यवस्थेशीही खोलवर जोडलेला असतो. नुकत्याच केलेल्या संशोधनात वैज्ञानिकांना आढळून आले की, ज्या देशांतील नागरिकांचा धर्मावर दृढ विश्वास असतो आणि जे स्वर्ग अन् नरक यांचे अस्तित्व मानतात, त्या देशांची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होते. अर्थशास्त्राचे तज्ञ म्हणवले जाणारे एडम् स्मिथ यांनी धर्म आणि अर्थव्यवस्था यांच्या संबंधावर पहिल्यांदाच प्रकाश टाकला होता. एडम् स्मिथ यांनी लिहिलेल्या पुस्तकात ‘द वेल्थ ऑफ नेशन्स’ (राष्ट्राची संपत्ती) याविषयी विस्ताराने विवेचन केले आहे.

धर्म आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करतो ! – मॅक्स वेबर, राजकीय तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ

‘राजकीय तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर यांनीही आपल्या तर्कामध्ये याच सत्याला अधोरेखित केले होते. त्यांनी असे म्हटले होते की, प्रॉटेस्टंट (ख्रिस्त्यांचा एक पंथ) समुदायातील सुधारणेच्या फलस्वरूप अशी मानसिक क्रांती झाली आहे. त्यामुळे आधुनिक भांडवलवादाचा आरंभ केला आहे. आजही अर्थशास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की, प्रामाणिकपणा, नैतिकता, विश्वास आणि एकता यांचा धडा शिकवून धर्म आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करतो.’

धर्म मानणार्‍या देशांची प्रगती भौतिक विकसनशील देशांच्या तुलनेत होते जलद गतीने ! – प्रा. रॉबर्ट बॉरो, अर्थशास्त्रज्ञ आणि रचेल मॅक्लिरी, राजकीय तज्ञ; हॉवर्ड विश्वविद्यालय

‘नुकतेच हॉवर्ड विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्रज्ञ प्रा. रॉबर्ट बॉरो आणि राजकीय तज्ञ रचेल मॅक्लिरी यांनी केलेल्या संशोधनाचा निष्कर्षही या सत्याला पुष्टी देतो. या संशोधनासाठी बॉरो आणि मॅक्लिरी यांनी जगातील ६६ देशांतील नागरिकांचा अभ्यास केला. त्यांनी त्यासाठी प्रत्येक देशातील १ सहस्र व्यक्ती निवडल्या आणि त्या नागरिकांना त्यांची जीवनमूल्ये, विश्वास आणि धार्मिकतेची जोड यांविषयी माहिती विचारली. त्या लोकांना असे विचारण्यात आले होते की, ते कधी धार्मिक विधींना उपस्थित रहातात का ? आणि ते आपल्या धर्माच्या शिक्षणाला अनुरूप अशी कमाई करतात का ?

त्यांनी एकत्रित केलेल्या आकडेवारीनुसार दिसून आले की, ज्या देशांमध्ये स्वर्ग आणि नरक या संकल्पना प्रचलित आहेत, तेथे सर्व स्वदेशी (घरगुती) उत्पादनांची क्षमता सरासरीपेक्षा ०.५ टक्के अधिक असते. या व्यतिरिक्त शिक्षणासारख्या अन्य विषयांचाही यावर प्रभाव पडतो. मुसलमान देशांमध्ये स्वर्ग आणि नरक यांची संकल्पना ख्रिस्ती देशांच्या तुलनेत अधिक प्रचलित आहे. या देशांमध्ये नरकाला पुष्कळ मोठ्या पापाची कठोर शिक्षा मानले जाते आणि लोक नरकाला पुष्कळ घाबरतात. प्रा. रॉबर्ट बॉरो यांचे म्हणणे आहे की, नरकाची भीती लोकांना स्वर्गाच्या स्वप्नांपेक्षा अधिक प्रभावित करत असते. संशोधनात असेही आढळले की, मुसलमान देशांमध्ये आर्थिक प्रगतीची गती अधिक आहे. ती भौतिक विकसनशील देशांच्या तुलनेत जलद आहे.’

(साभार : दैनिक ‘भास्कर’, भोपाळ, २४.१०.२००२)