‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या पू. (सौ.) योया वाले यांचे ‘समष्टी संतपद’ घोषित केलेल्या सोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘३०.१०.२०२१ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ.’ च्या सत्संगात ‘एस्.एस्.आर्.एफ.’ चे समष्टी संत पू. देयान ग्लेश्चिच यांनी कु. अनास्तासिया वाले हिने ‘६१ टक्के’ व्यष्टी पातळी प्राप्त केल्याचे घोषित केले. त्याचप्रमाणे सौ. योया वाले यांनी ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘समष्टी  संतपद’ प्राप्त केल्याचे घोषित केले. या कार्यक्रमाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

पू. (सौ.) योया सिरियाक वाले यांची सन्मान सोहळ्यातील प्रसन्न मुद्रा

१.  कु. अनास्तासिया वाले हिची आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे

१ अ. कु. अनास्तासियाची आध्यात्मिक पातळी घोषित केल्यावर कार्यक्रमस्थळी महर्लाेकाचे वायूमंडल निर्माण होऊन सर्वत्र निळसर रंगाचा दैवी प्रकाश पसरल्याचे सूक्ष्मातून जाणवून वातावरण दैवी होणे : जेव्हा पू. देयानदादांनी ‘कु. अनास्तासिया वाले हिने ६१ टक्के व्यष्टी पातळी प्राप्त केली आहे’, असे घोषित केले, तेव्हा कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून महर्लाेकाचे वायूमंडल निर्माण झाल्याचे आणि सर्वत्र निळसर रंगाचा दैवी प्रकाश पसरल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणचे वातावरण दैवी झाले.

कु. अनास्तासिया वाले

१ आ. कु. अनास्तासिया दैवी बालिका असल्यामुळे तिची आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे निसर्गालाही आनंद होणे आणि तिच्या अंगावर ३ फुलपाखरे सूक्ष्मातून बसलेली दिसणे : कु. अनास्तासियाची पातळी घोषित झाल्यानंतर तिने मनोगत व्यक्त केले, तेव्हा तिच्या अंगावर मला पिवळ्या, निळसर आणि गुलाबी रंगांची तीन फुलपाखरे सूक्ष्मातून बसलेली दिसली. कु. अनास्तासिया दैवी बालिका असल्यामुळे तिची आध्यात्मिक उन्नती झाल्यामुळे निसर्गालाही आनंद झाल्याचे जाणवले. त्यामुळे जेव्हा ती तिचे मनोगत व्यक्त करत होती, तेव्हा तिच्याकडे सूक्ष्मातून फुलपाखरे आल्याचे दिसले.

१ इ. कु. अनास्तासिया बोलत असतांना पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवणे आणि माझाही कृतज्ञताभाव जागृत होणे : जेव्हा कु. अनास्तासिया बोलत होती, तेव्हा तिच्या वाणीतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव जाणवत होता आणि माझ्यातही कृतज्ञताभाव जागृत झाल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे तिचे बोलणे ऐकत असतांना आनंद जाणवून ‘तिचे बोलणे संपूच नये आणि ते ऐकतच रहावे’, असे वाटत होते.

कु. मधुरा भोसले

२. पू. योयाताई यांनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे

२ अ. सद्गुरु सिरियाक वाले यांचे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे : कार्यक्रमाला आरंभ झाल्यावर जर्मनी येथे असणारे  पू. योयाताई यांचे पती सद्गुरु सिरियाक वाले यांचे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले. तेव्हा सद्गुरु जरी स्थुलातून एके ठिकाणी उपस्थित असले, तरी त्यांचे सूक्ष्म रूप सूक्ष्मातून विविध ठिकाणी उपस्थित राहून आध्यात्मिक कार्य करत असते’, हे मला अनुभवण्यास मिळाले.

२ आ. पू. देयानदादांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे : कार्यक्रमाला आरंभ केल्यावर पू. देयानदादांच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले. यावरून ‘पू. देयानदादांच्या निस्सीम भावामुळे ते परात्पर गुरुदेवांशी सूक्ष्मातून किती एकरूप झाले आहेत’, याची अनुभूती आली.

२ इ. स्थूल देहाचे जडत्व आणि भार न जाणवता ‘हलकी होऊन हवेत तरंगत आहे’, असे जाणवणे : पू. देयानदादांनी पू. योयाताईंनी संतपद प्राप्त केल्याचे घोषित केल्यावर कार्यक्रमस्थळी जनलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण होऊन सर्वत्र पिवळसर रंगाचा दैवी प्रकाश पसरला. त्यामुळे कार्यक्रमस्थळी मला माझ्या स्थूल देहाचे जडत्व आणि भार न जाणवता ‘मी हलकी होऊन हवेत तरंगत आहे’, अशी अनुभूती आली.

२ ई. प्रथम श्रीविष्णूच्या पांचजन्य शंखाचा नाद ऐकू येणे, तेव्हा पू. योयाताईंकडून वातावरणात मारक शक्ती प्रक्षेपित होणे, नंतर श्रीकृष्णाच्या बासरीचा सुमधुर स्वर ऐकू येणे आणि तेव्हा पू. योयाताईंकडून वातावरणात तारक शक्ती प्रक्षेपित होणे : हा सोहळा चालू असतांना मला श्रीविष्णूच्या पांचजन्य शंखाचा नाद ऐकू आला आणि पू. योयाताईंच्या देहातून वातावरणात मारक शक्ती प्रक्षेपित झाल्याचे जाणवले. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींनी साधकांवर आणलेले त्रासदायक काळ्या शक्तीचे आवरण नष्ट झाले. त्यानंतर मला श्रीकृष्णाच्या बासरीचा सुमधुर स्वर ऐकू आला. तेव्हा पू. योयाताईंच्या देहातून तारक शक्तीचे प्रक्षेपण होऊन कार्यक्रमाला आलेल्या आम्हा सर्व साधकांची प्राणशक्ती वाढल्याचे जाणवले.

२ उ. पू. योयाताईंच्या हृदयातून प्रीतीच्या लहरी वातावरणात पसरणे आणि त्यांच्या हृदयातून गुलाबी रंगाचा दैवी प्रकाश पसरल्याचे जाणवणे : जेव्हा पू. योयाताईंना पू. देयान यांनी पुष्पहार घातला, तेव्हा पू. योयाताईंच्या हृदयातून प्रीतीच्या लहरी वातावरणात पसरल्या आणि त्यांच्या हृदयातून गुलाबी रंगाचा दैवी प्रकाश पसरल्याचे जाणवले. तेव्हा वायूमंडलात पुष्कळ प्रमाणात शीतलता जाणवली आणि चंदनाचा सुगंध दरळवला. (पू. देयान आणि कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या काही साधकांनाही कार्यक्रमस्थळी चंदनाचा सुगंध आल्याचे जाणवले – संकलक)

२ ऊ. पू. योयाताईंना घातलेल्या पुष्पहाराकडे पाहून भाव जागृत होणे आणि पू. योयाताईंनी पुष्पहार परिधान केल्यामुळे हाराला आनंद झाल्याचे जाणवणे : पू. योयाताईंना घातलेल्या पुष्पहाराकडे पाहून माझा पुष्कळ भाव जागृत होत होता. त्यांच्या पुष्पहारातील प्रत्येक पुष्प हे पू. योयाताईंमधील ‘भाव, चिकाटी, तळमळ, शिकण्याची वृत्ती, विनम्रता, जिज्ञासा’ इत्यादी गुणांचे प्रतीक असल्याचे जाणवले. त्यामुळे  पू. योयाताईंनी पुष्पहार परिधान केल्यामुळे त्या हाराला आनंद झाल्याचे जाणवले.

२ ए. ‘हा कार्यक्रम पृथ्वीवर होत नसून वैकुंठातच चालू आहे’, असे जाणवणे आणि कार्यक्रम स्थळी विष्णुरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून आणि महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवणे : त्यामुळे ‘हा कार्यक्रम चालू असतांना काळ थांबलेला आहे’, असे जाणवले.

२ ऐ. पू. योयाताई विशाल कमळावर विराजमान झाल्याचे जाणवणे आणि त्यांच्या ठिकाणी महालक्ष्मीदेवीचे तारक तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवणे : पू. योयाताईंचा सन्मान झाल्यानंतर त्या जेव्हा व्यासपिठावर आसंदीत बसल्या, तेव्हा मला आसंदीच्या ठिकाणी गुलाबी रंगाचे मोठे कमळ दिसले आणि पू. योयाताई विशाल कमळावर विराजमान झाल्याचे जाणवले. तेव्हा मला पू. योयाताईंच्या ठिकाणी श्रीमहालक्ष्मीदेवीचे तारक तत्त्व कार्यरत झाल्याचे जाणवले.

२ ओ. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने पू. योयाताईंकडे तिच्या डोळ्यांतून काळसर रंगाच्या धुराच्या रूपाने त्रासदायक शक्ती सोडणे आणि तेव्हा पू. योयाताईंच्या ठिकाणी वाघावर बसलेल्या दशभुजा श्रीदुर्गादेवीचे दर्शन होणे अन् देवीने साधिकेला त्रास देणार्‍या वाईट शक्तीशी सूक्ष्म युद्ध करणे : कार्यक्रम चालू असतांना एका साधिकेला त्रास देणारी वाईट शक्ती पू. योयाताईंकडे पाहून डोळ्यांतून काळसर रंगाच्या धुराप्रमाणे त्रासदायक शक्ती सोडून सूक्ष्म युद्ध करत होती. तेव्हा मला पू. योयाताईंच्या ठिकाणी वाघावर बसलेल्या दशभुजा श्रीदुर्गादेवीचे दर्शन झाले आणि त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात मारक शक्ती अन् शस्त्रे वाईट शक्तीच्या दिशेने प्रक्षेपित झाली. त्यानंतर ती वाईट शक्ती शांत झाली आणि तिने ध्यान लावले. तेव्हा पू. योयाताईंच्या ठिकाणी दिसणार्‍या श्रीदुर्गादेवीचे रूप लुप्त होऊन पुन्हा महालक्ष्मीदेवीचे रूप दिसू लागले. यावरून हे शिकायला मिळाले की, जेव्हा वाईट शक्ती सूक्ष्म युद्ध करत असतात, तेव्हा संतांमध्ये देवतांचे मारक तत्त्व कार्यरत होते. जेव्हा वाईट शक्ती शांत असतात, तेव्हा संतांमध्ये देवतांचे तारक तत्त्व कार्यरत असते. अशा प्रकारे संतांकडून समष्टीकडे म्हणजे, साधकांकडे आवश्यकतेनुसार देवतांचे तारक किंवा मारक तत्त्व प्रक्षेपित होते.

२ औ. कार्यक्रमस्थळी सप्तदेवतांचे अस्तित्व जाणवणे आणि त्यांनी साधकांना आशीर्वाद देणे :  हा सोहळा चालू होता, तेव्हा कार्यक्रमस्थळी शिव, दत्त, हनुमान, श्रीराम, श्रीकृष्ण, गणपति आणि श्रीदुर्गादेवी या सप्तदेवतांचे अस्तित्व सूक्ष्मातून जाणवले आणि तेथे इंद्रधनुष्य दिसले. सप्तदेवतांनी कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या ‘एस्.एस्.आर्.एफ्’ च्या साधकांना आशीर्वाद दिल्याचे जाणवले.

२ अं. कार्यक्रमस्थळी अंतरिक्षाप्रमाणे पोकळी निर्माण झाल्याचे आणि नक्षत्रलोक अवतरल्याचे जाणवणे : हा सोहळा चालू असतांना कार्यक्रमस्थळी अंतरिक्षाप्रमाणे पोकळी निर्माण झाल्याचे जाणवले आणि त्यात असंख्य चांदण्या चमकतांना दिसल्या. तेव्हा ‘पृथ्वीवर होणारा हा दैवी सोहळा पहाण्यासाठी नक्षत्रलोकच पृथ्वीवर अवतरला असून अनेक नक्षत्रांच्या नेत्रांतून निर्गुण निराकार ईश्वरच हा भावसोहळा पहात आहे’, असे जाणवले.

२ क. पू. योयाताईंनी आलिंगन दिल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती : कार्यक्रमानंतर जेव्हा पू. योयाताईंना भेटायला गेले, तेव्हा मी त्यांना वाकून नमस्कार करतांना त्यांनी मला नमस्कार करू न देता मला प्रेमाने आलिंगन दिले. तेव्हा मला त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चांगली शक्ती माझ्या अनाहतचक्रातून माझ्या देहात जातांना जाणवली आणि मला होणारा आध्यात्मिक त्रास न्यून झाल्याचे जाणवले. त्याचप्रमाणे मला त्यांनी आलिंगन दिल्यावर माझ्या देहात चैतन्य जाऊन माझ्या मनाला आनंदाची अनुभूती आली. तेव्हा ‘पू. योयाताई जगन्माता असून त्यांच्या रूपाने मला श्रीमहालक्ष्मीदेवीनेच प्रेमाने कवटाळले आहे’, असे जाणवून माझ्या हृदयात कृतज्ञताभाव जागृत झाला आणि मी हात जोडून नमस्कार केला.

कृतज्ञता

‘हे विष्णुस्वरूप परात्पर गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळे मला पू. योयाताईंच्या संतसोहळ्याला उपस्थित राहून दैवी लोकाची आणि सूक्ष्म स्तरावर घडलेल्या घटनांची अनुभूती घेण्याची संधी मिळाली, यासाठी मी तुमच्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक