‘सरदार उधम’ यांचा अवमान !

संपादकीय

सावरकर यांचा द्वेष करणाऱ्या कॉंग्रेसला सरदार उधमसिंह यांचा पुळका वाटणे, हा दुटप्पीपणाच ! 

वर्ष १९०६ ते १९१० या ४ वर्षांच्या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटीश राजसत्तेचा गढ असलेल्या लंडनमध्ये जाऊन भारतियांच्या संघटनाचे अमूल्य कार्य केले. क्रूरकर्मी ब्रिटिशांची कृत्ये जगाच्या व्यासपिठावर मांडणार्‍यांमध्ये सावरकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्याखेरीज मदनलाल धिंग्रा, व्ही.व्ही.एस्. अय्यर यांच्यासारख्या अनेक प्रतिभावान भारतियांमध्ये क्रांतीची ज्योत पेटवणारेही सावरकरच होते. त्यांच्या या कार्याविषयी जेवढी जागृती भारतीय विशेषकरून मराठी माणसामध्ये आहे, तेवढी खचितच क्रांतीकारक सरदार उधमसिंह यांच्याविषयी असेल. सावरकर यांच्यानंतर इंग्लंडच्याच धरतीवर साधारण २५ वर्षांनंतर स्वत:च्या क्रांतीकार्याने जगाचे लक्ष वेधून घेणारे महान क्रांतीकारक म्हणजे सरदार उधमसिंह ! शत्रूच्या पापांची आग तब्बल २० वर्षांहून अधिक काळ मनात धगधगत ठेवून त्याचा प्रतिशोध घेणारे आधुनिक इतिहासातील एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणून सरदार उधमसिंह यांचे घेता येईल. २३ मार्च १९१९ या दिवशी ब्रिटिश अधिकारी मायकेल ओड्वायर याच्या आदेशानुसार ब्रिटीश पोलिसांनी जालियनवाला बाग येथे १ सहस्राहून अधिक भारतियांची हत्या केली होती. या हत्याकांडामध्ये १ सहस्र ५०० हून अधिक लोक घायाळ झाले होते. पंजाब प्रांत धगधगत होता. २० वर्षीय उधमने हे सर्व प्रत्यक्ष पाहिले होते. याचा राग मनात ठेवून त्यांनी वर्ष १९३३ मध्ये इंग्लंड गाठले. मायकेल ओड्वायर याची हत्या करण्यासाठी ६ वर्षे वाट पाहिली आणि योग्य वेळी एका जाहीर कार्यक्रमात त्यास यमसदनी धाडले. त्यांच्या या साहसी आणि राष्ट्रप्रेमी कृत्याची नोंद अभावानेच कुणी घेतली असेल ! नुकताच निघालेला ‘सरदार उधम’ या चित्रपटात याविषयी सविस्तर आणि अत्यंत अभ्यासपूर्णरित्या चित्रण करण्यात आले आहे. अर्थात् काहीही चांगले घडले आणि त्यावर राजकारण झाले नाही, याचे सुवेरसुतक भारतीय राजकारण्यांना नाही. हा चित्रपट ब्रिटिशांच्या साम्राज्यवादावर टीका करणारा आहे, तसेच ब्रिटिशांनी भारतावर केलेल्या अन्यायाला या चित्रपटाद्वारे वाचा फोडण्यात आली आहे. जागतिकीकरणाच्या काळात अशा प्रकारे दुसर्‍या देशावर टीका करणे योग्य नाही, असे काहीसे कारण देत ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ या सरकारी संस्थेने या चित्रपटाला ‘ऑस्कर’ पुरस्कारासाठी नामांकित केले नाही.

दुटप्पी काँग्रेस !

यावर काँग्रेसचे पित्त खवळले. तिने सत्ताधारी भाजपवर आगपाखड करण्यास आरंभ केला आहे. सरदार उधमसिंह यांच्या क्रांतीकार्याचा पुळका आल्याची भासवणारी काँग्रेस याच उधमसिंह यांचा सहकारी मित्र भगतसिंह यांना ‘आतंकवादी’ म्हणत आली आहे. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. यास आतापर्यंत अनेकांनी विरोध दर्शवला; परंतु काँग्रेसला त्याच्याविषयी कधीच काही वाटले नाही, किंबहुना तिला ‘क्रांतीकारी हे आतंकवादी वाटतात’, हेच सत्य आहे. हे सूत्र स्पष्ट करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदाहरण पुरेसे आहे. स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी केलेल्या अतुलनीय त्यागाची सर नसलेले काँग्रेसी त्यांना ‘माफीवीर’ म्हणजे ‘दोन जन्मठेपांची शिक्षा न्यून होण्यासाठी ब्रिटिशांची ‘माफी’ मागणारे सावरकर’ म्हणून वारंवार हिणवतात. इतिहासाचा अभ्यास असणार्‍या प्रत्येक राष्ट्रनिष्ठ नागरिकाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी ही लांच्छनास्पद टीका आहे. त्यामुळे उधमसिंह यांच्या चित्रपटावर अन्याय झाल्याची ओरड करणार्‍या काँग्रेसचा हा दुटप्पीपणा आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धांमध्ये ब्रिटिशांसाठी लढणार्‍या तब्बल २६ लाख भारतीय सैनिकांना स्वत:चा जीव गमवावा लागला होता. वर्ष १९४३ मध्ये बंगालमध्ये झालेल्या दुष्काळात ४ लाख भारतीय बळी पडण्यामागे ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील धोरणे कारणीभूत होती, असे मत आयआयटी गांधीनगर येथील तज्ञांनी अभ्यासाअंती मांडले आहे. १०१ वर्षांपूर्वी झालेल्या एकट्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा विचार जरी केला, तरी ब्रिटनने यासंदर्भात आजपर्यंत भारताची अधिकृत क्षमायाचना केलेली नाही. स्वतंत्र भारतात सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या काँग्रेसने यासाठी कधी काही प्रयत्न केले नाहीत. ग्लासगो येथे विविध जागतिक कार्यक्रमांना नुकतेच जाऊन परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्याशी झालेल्या जवळीकतेचा लाभ घेऊन निकटच्या भविष्यात या दिशेने कूटनैतिक स्तरावर प्रयत्न करावेत, अशी प्रत्येक संवेदनशील नागरिकाची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय अस्मितेचा अभाव !

आता ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’वर झालेल्या आरोपांचा विचार करूया. ‘सरदार उधम’ चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन न दिल्यामुळे अनेकांकडून ओढवलेल्या रोषाला या सरकारी संस्थेने उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले, ‘सरदार उधम’ चित्रपट चांगल्याप्रकारे करण्यात आला असला, तरी ‘ऑस्कर’ पुरस्कार मिळण्यासाठी आम्हाला धोरण ठरवावे लागते. ऑस्कर देणार्‍यांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागतो. हे नामांकन राष्ट्रीय पुरस्कारांसाठी नसून ९२ देशांतून एक चित्रपट निवडण्याच्या जागतिक शर्यतीचा भाग आहे. आजपर्यंत आपण एकही ‘ऑस्कर’ जिंकलेला नाही.’ ऑस्करसाठी भारताकडून तमिळ चित्रपट ‘कूझंगल’ याचे नामांकन करण्यात आले आहे. ऑस्करचा इतिहास पाहिल्यास ब्रिटीश साम्राज्यवाद आणि भारतविरोधी वैचारिक आतंकवाद यांचा तेथे पुरस्कार झालेला दिसून येतो. वर्ष २००८ मध्ये भारतद्वेष पुढे रेटणार्‍या ‘स्लमडॉग मिलेयनर’ या विदेशी चित्रपटाला ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पाश्चिमात्य नेहमीच भारताला पाण्यात पहात आले आहेत. त्याचेच हे उदाहरण आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी खरेतर ‘सरदार उधम’ चित्रपटाला नामांकन मिळणे आवश्यक होते; परंतु त्याला डावलण्यात आपलेच काही महाभाग कारणीभूत ठरले. ‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारतियांनी अंतर्मुख होण्याची किती आवश्यकता आहे ?, हे यातून प्रकर्षाने लक्षात येते, हेच खरे !