सद्गुरु (कु.) स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधिकांना झालेले लाभ आणि त्यांनी स्वतःमध्ये अनुभवलेले पालट

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (प.पू. गुरुदेवांच्या) कृपेने सद्गुरु (कु.) स्वाती खाडये गेल्या २ मासांपासून आध्यात्मप्रसार करणार्‍या काही साधकांचा नियमित व्यष्टी आढावा घेत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, गोवा राज्य आणि कोकण प्रांत येथील काही साधक प्रतिदिन त्यांना व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा देतात. या सत्संगामुळे सर्व साधिकांमध्ये सकारात्मकता आणि व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे. त्यामुळे सेवा आणि व्यष्टी साधना यांतील आनंदही अनुभवता येत आहे. यातील काही साधकांचे प्रयत्न सद्गुरु ताई आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत. सद्गुरु ताईंना अपेक्षित असे प्रयत्न करण्यास आम्ही अजूनही पुष्कळ अल्प पडत आहोत. ‘त्यांना अपेक्षित असे घडण्यासाठी शरणागतभावाने प्रयत्न करता येऊ देत’, अशी सद्गुरु ताईंच्या चरणी आर्ततेने प्रार्थना आहे.’

– आढाव्यातील सर्व साधिका                     

(भाग २)

भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/524097.html

सौ. कल्पना थोरात, मिरज

सौ. कल्पना थोरात

१. आधीची स्थिती

‘पूर्वी स्वयंसूचनांचे सत्र करतांना माझ्या मनात विचारांचे वादळ येऊन सत्र होत नसे. मला सहसाधकांच्या चुका दिसून मनात त्यांच्याविषयी पुष्कळ प्रतिक्रिया यायच्या. माझ्या मनात ‘त्यांनी पालटायला हवे. त्यांच्यामुळे मला त्रास होतोय’, असे विचार असायचे. त्यामुळे साधकांशी बोलतांना माझ्या अनाहतचक्रावर प्रचंड दाब जाणवायचा. त्यामुळे मी कुणाशी ४ शब्दही मनमोकळेपणाने बोलू शकत नसे. माझ्या तोंडवळ्यावर सतत ताण दिसायचा. माझ्याकडून शरिरावरील आवरण काढणे आणि नियमित नामजपादी उपाय करणेही होत नसे. माझ्या मनात सतत नकारात्मक विचार असल्यामुळे सेवेवरही त्याचा परिणाम होत असे.

२. व्यष्टी आढावा सत्संगामुळे अनुभवलेले पालट

२ अ. नामजप गुणात्मक आणि भाव ठेवून केल्याने मनात अत्यल्प विचार येणे : व्यष्टी आढावा नियमित चालू झाल्यापासून मला स्वतःत पुष्कळ पालट जाणवत आहेत. २ घंटे गुणात्मक नामजप होण्यासाठी, विविध भाव ठेवण्यासाठी आणि नामजप सतत होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न केले जातात. त्यामुळे मनात येणारे विचार अत्यल्प झाले आहेत.

२ आ. स्वयंसूचनांची सत्रे करतांना ‘श्री सरस्वतीमाता चैतन्य देत आहे’, असे जाणवणे : ‘स्वयंसूचनांमुळे माझ्यातील स्वभावदोष नष्ट होऊन गुण वाढणार आहेत’, याची मला जाणीव असते. दिवसभरात १० सत्रे करतांना श्री सरस्वतीमातेला प्रार्थना होऊन ‘ती चैतन्य देत आहे’, असे जाणवते.

२ इ. स्वभावदोषांचे प्रमाण न्यून होऊन देवाचे विचार ग्रहण करण्याची क्षमता वाढणे : नामजपादी उपायांमुळे माझी सकारात्मकता वाढत असून ईश्वरी चैतन्य ग्रहण होत आहे. माझा आत्मविश्वास वाढला आहे. माझी भीती नष्ट झाली आहे. मला सर्वांमध्ये मिसळता येत आहे. देवाचे विचार ग्रहण करण्याची क्षमता वाढल्याचे जाणवते. ‘सर्वकाही देवच करणार आहे. मी एक माध्यम आहे’, याची जाणीव वाढल्याने माझा ताण न्यून झाला आहे. स्वतःचे निरीक्षण वाढले असून स्वतःच्या चुका इतरांना विचारल्या जातात.

२ ई. भाववृद्धीसाठी प्रयत्न होऊ लागल्याने देवाच्या अनुसंधानात रहाणे जमू लागणे : पूर्वी ‘भाव कसा ठेवायचा ?’, हे मला कळत नसे. आता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक भाव ठेवून स्वतःला देवाशी जोडण्याचे प्रयत्न केले जातात. आता मला ‘देवाला शरण कसे जायचे ?’, हे कळले आणि न्यूनपणा घेता येऊ लागला आहे. माझे क्षमा मागण्याचे प्रयत्नही वाढले आहेत. सर्व इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना गुरुचरणी ठेवून प्रार्थना केल्याने इंद्रियांची क्षमता वाढून त्रास न्यून झाल्याचे जाणवत आहे. मानस दंडवत घालतांना गुरुचरणांच्या स्पर्शाने आनंद आणि चैतन्य मिळते. तेव्हा वाटते, ‘देव आपल्या रक्षणासाठी सतत त्याचे चिंतन आणि अनुसंधान यांत ठेवत आहे.’

(१५.३.२०२०)

कु. अनुराधा जाधव, गोवा

कु. अनुराधा जाधव

१. आधीची स्थिती

‘माझ्या मनात दायित्व घेऊन सेवा करण्याविषयी नकारात्मकता असायची. ‘ही सेवा करायला नको’, असे मला वाटायचे. साधकांच्या लक्षात आलेल्या चुका माझ्याकडून प्रतिक्रियात्मक आणि अपेक्षा ठेवून सांगितल्या जात असत. चुका सांगतांना प्रतिमेचाही भाग असायचा. अकस्मात् काही सेवा आल्या, तर मला ताणही यायचा. ठरलेल्या नियोजनात पालट झाला, तर ते मला लगेच स्वीकारता येत नसे. तेव्हाही माझ्या मनाचा संघर्ष व्हायचा.

२. व्यष्टी आढावा सत्संगामुळे झालेले पालट

२ अ. नकारात्मकता न्यून होऊन साधकांना साहाय्य म्हणून चुका सांगणे आणि त्यांच्याशी बोलणे शक्य होणे : आता माझ्या मनात सेवेविषयी नकारात्मक विचार येत नाहीत आणि मनाचा उत्साहही वाढला आहे. साधकांच्या स्थितीनुसार काय काय करू शकतो, ते प्रयत्न देव सुचवत आहे आणि त्यातील आनंद मला घेता येत आहे. आता साधकांना चुका सांगतांना ‘ते नकारात्मकतेत जाणार नाहीत आणि त्यांना चुकीची जाणीवही होईल’, असे सांगण्याचा प्रयत्न माझ्याकडून देवच करवून घेत आहे. साधकांच्या चुका वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न माझ्याकडून होऊ लागला आहे. आता प्रतिमेचा भाग थोडा अल्प झाला आहे. काही साधकांविषयी मनात पूर्वग्रह रहायचा. तो आता रहात नाही. त्यांच्याशी बोलून घेतले जाते.

२ आ. मनाला स्थिरता येऊन प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे जमू लागणे : मनाचा संघर्ष न्यून होऊन स्थिर रहाता येऊ लागले आहे. देवाचे साहाय्य घेण्याचा भाग वाढल्याने मनावर येणारा ताणही अल्प झाला आहे. शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर मात करण्याचा प्रयत्न वाढला आहे. प.पू. गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे वाढले आहे आणि त्यामुळे हलके वाटत आहे. ‘दिवसभरात व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करूया’, हे विचार अधिक असल्याने अनावश्यक विचारांचे प्रमाण अल्प होत आहे. अजून पुष्कळ अल्प पडत आहे. प्रयत्न पुष्कळ वाढवायला हवेत.’

(१५.३.२०२०)

डॉ. (सौ.) साधना जरळी, चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) यांच्यात व्यष्टी आढावा सत्संगामुळे झालेले पालट

डॉ. (सौ.) साधना जरळी

१. व्यष्टी साधनेचे संख्यात्मक प्रयत्न चालू झाल्याने ‘भगवंतच करून घेत आहे’, हे जाणवणे

‘पहिल्या दिवशी सद्गुरु स्वातीताई माझ्या स्वप्नात आल्या आणि मला म्हणाल्या, ‘आज तुझा आढाव्याचा पहिला दिवस आहे. तू चिंतन कर. सर्वांचा आढावा ऐक आणि मग तुझा आढावा सांग.’ त्यानुसार मी चिंतन लिहून काढले आणि आढावा दिला. देवाच्या कृपेने व्यष्टी साधनेचे प्रथम संख्यात्मक प्रयत्न करणे चालू झाले. यामध्ये स्वयंसूचनांची सत्रे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय, भगवंताला दंडवत घालणे, या कृती ‘भगवंतच करून घेत आहे’, हे क्षणोक्षणी जाणवते.

२. स्वभावदोषांची तीव्रता अधिक असल्याचे लक्षात येणे आणि मनाच्या प्रक्रियेकडेही लक्ष जाणे

‘घरामध्ये वावरतांना आणि साधकांच्या समवेत सेवा करतांना ‘माझ्या मनाची विचारप्रक्रिया कशी आहे ? मनाची स्थिरता कुठे ढासळते ?’, याचे देवाच्या कृपेने निरीक्षण होऊ लागले आहे. ‘माझ्यामध्ये अपेक्षा करणे, कर्तेपणा घेणे आणि प्रतिमा जपणे, या स्वभावदोषांची तीव्रता अधिक आहे’, हे लक्षात आले. त्यानुसार घडणार्‍या प्रसंगांत स्थिर राहून स्वभावदोषांवर मात करण्यासाठी आणि प्रसंगातून शिकण्यासाठी प्रयत्न होऊ लागले. अपेक्षा केल्याने मनामध्ये तीव्र प्रतिक्रिया यायच्या. काही प्रसंगांमध्ये त्या व्यक्तही व्हायच्या. आढावा चालू झाल्यापासून देवाच्या कृपेने ‘मी त्या प्रसंगामध्ये शांत राहून ऐकून घ्यायला पाहिजे’, हे लक्षात आले. माझ्यात पालट होत नाही, तोपर्यंत असे प्रसंग वारंवार घडत रहाणार. त्यामुळे ‘स्वतःलाच पालटायला पाहिजे’, हा विचार मनावर बिंबला. त्यानुसार देव अयोग्य विचार आणि कृती यांची जाणीव करून देऊ लागला. संघर्ष होत असतांना त्यावर मात करण्यासाठी देव शक्ती देत असल्याचे जाणवते. अनेक प्रसंगांमध्ये ‘सद्गुरु ताई असत्या, तर मी कशी वागले असते ? त्यांना काय आवडले असते ?’, हा विचार मनामध्ये येऊन योग्य कृती करण्यासाठी प्रयत्न होऊ लागले.

३. व्यष्टी साधना पूर्ण झाल्यामुळे दिवसभर थकवा किंवा निरुत्साह न जाणवता अखंड उत्साह, सकारात्मकता आणि मनाची आनंदावस्था टिकून रहाणे

यापूर्वी माझ्याकडून भाव ठेवण्यासाठी निरनिराळे प्रयत्न होत नव्हते. देवाच्या कृपेने हे प्रयत्न होऊ लागले. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला. ‘देवाला काहीही अशक्य नाही’, हे वाक्य मनामध्ये वारंवार घुमू लागले. आता ‘मला याच जन्मात ईश्वरप्राप्ती करायची आहे’, असे विचार मनामध्ये येतात. व्यष्टी साधना पूर्ण झाल्यामुळे दिवसभर थकवा किंवा निरुत्साह न जाणवता अखंड उत्साह, सकारात्मकता आणि मनाची आनंदी अवस्था टिकून राहू लागली. न्यूनगंड आणि नकारात्मक विचार अल्प झाले. सद्गुरु ताई सवलत न घेता आढावा घेतात. त्यामुळे ‘मी का सवलत घेते ?’, याची जाणीव होऊन माझ्यात सवलत घेण्याचे प्रयत्न न्यून झाले. या सत्संगामध्ये अन्य साधकांनी भावाचे, तसेच सेवा पूर्ण होण्यासाठी केलेले प्रयत्न शिकता आले. ‘साक्षात् भगवंत मला प्रतिदिन चैतन्याने भारित करत असून मला आध्यात्मिक ऊर्जा पुरवत आहे’, असे वाटते. मनामध्ये भरपूर कृतज्ञताभाव निर्माण झाला आहे.

भगवंताच्या अनंत कोटी कृपा आणि गुरुदेवांचे आशीर्वाद यांमुळे मिळत असलेल्या या सत्संगाप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

(१५.३.२०२०)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/524652.html