शिरोडा ग्रामस्थांचा वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयावर मोर्चा
वेंगुर्ले – तालुक्यातील काही भागांत ३ नोव्हेंबरला रात्रीपासून विजेचा लपंडाव चालू होता, तर ४ नोव्हेंबरला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी काही भागातील वीजपुरवठा खंडित झाल्याने दिवाळीची पहाट अंधारात गेली. ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नागरिकांच्या आनंदावर विरजण पडल्याने वीज वितरण आस्थापनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत होता.
दिवाळीपूर्वी वीज वितरण आस्थापनाने थकित वीजदेयकांच्या वसुलीसाठी मोठी मोहीम उघडली होती. यामध्ये देयक थकल्यामुळे अनेकांची वीजजोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे काहींनी शक्य नसतांनाही विजेचे देयक भरण्याचा प्रयत्न केला; मात्र तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांमधून अप्रसन्नता व्यक्त करण्यात येऊ लागली.
वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका शिरोडा, केरवाडी, बागायत, खाजनभाटी आदी भागांना बसला. त्यामुळे येथील संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरण आस्थापनाच्या कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदवला. या वेळी ग्रामस्थांनी वीजदेयकांच्या वसुलीसाठी मोहीम राबवणार्या वीज वितरण आस्थापनाने वीजपुरवठा सुरळीत करावा आणि नंतरच देयक वसुलीसाठी मोहीम राबवावी, अशी मागणी केली.