ज्येष्ठ नागरिक त्रस्त; मात्र प्रशासनाचा ध्वनीप्रदूषणाकडे कानाडोळा !
नागरिकांना त्रास होत असतांनाही ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करणारे असंवेदनशील पोलीस आणि प्रशासन ! – संपादक
पणजी, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – दीपावलीच्या पूर्वसंध्येला ३ नोव्हेंबर या दिवशी नरकासुर प्रतिमांच्या प्रदर्शनाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर ध्वनीप्रदूषण झाल्याने ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले; मात्र प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाकडे कानाडोळा केला.
पणजी, पर्वरी आणि आसपासच्या परिसरात नरकासुर प्रतिमांच्या प्रदर्शनाला अनुसरून ३ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता चालू झालेले डिजे संगीत रात्रभर चालू होते. या पाश्चात्त्य संगीताचा आवाज एवढा मोठा होता की, काहींच्या घरातील खिडक्यांची किंवा घराची दारे हालत होती.
१. याविषयी अधिक माहिती देतांना ज्येष्ठ नागरिक तथा निवृत्त शास्त्रज्ञ विनोद धारगळकर म्हणाले, ‘‘आम्ही अनेक ज्येष्ठ नागरिक बांबोळी येथे एका कॉलनीत रहातो. दीपावलीच्या निमित्ताने मोठ्या आवाजात संगीत लावणे चुकीचे आहे. मनुष्य अथवा पाळीव प्राणी यांना अमूक एका प्रमाणापर्यंत आवाज ऐकण्याची क्षमता असते. ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.’’
२. काही ठिकाणी रुग्णालयाच्या २०० मीटर परिसरात नरकासुर प्रतिमा मोठ्या आवाजात डिजेवर पाश्चात्त्य संगीत लावून प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यु. एच्.ओ.) मते ध्वनीप्रदूषणामुळे आरोग्याला धोका संभवतो. ध्वनीप्रदूषणामुळे कानाच्या ऐकण्याच्या क्षमता, हृदय आणि झोप यांवर विपरीत परिणाम होतो. गर्भवती महिलांनाही ध्वनीप्रदूषणामुळे त्रास होतो.
३. याविषयी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय म्हणाले, ‘‘शासन ध्वनीप्रदूषणावर देखरेख ठेवून आहे. यासाठी एक गट स्थापन करण्यात आला आहे. पोलीसही वेळोवेळी गस्त घालत असतात. या अनुषंगाने शासनाने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि कुणालाही ध्वनीप्रदूषणाचा त्रास होत असल्यास त्यांनी त्याविषयी नियंत्रण कक्षाकडे तक्रार करावी. तक्रारीनंतर शासन संबंधितांवर कारवाई करेल.’’ (ध्वनीप्रदूषण होत असल्याचे प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? कुणाच्या तक्रारीसाठी का थांबावे लागते ? प्रशासनाची ही निष्क्रीयताच नव्हे, तर असंवेदनशीलता आहे ! – संपादक)
४. ध्वनीप्रदूषणाचा त्रास सहन केलेल्या काही नागरिकांच्या मते त्यांनी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे ध्वनीप्रदूषणाविषयी संपत्राच्या (ईमेलच्या) माध्यमातून तक्रार नोंदवली; मात्र या तक्रारीकडे शासनाने दुर्लक्ष केले. (याविषयी जिल्हाधिकारी अजित रॉय यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)
५. सांताक्रूझ येथील नागरिक संजीव सरदेसाई ध्वनीप्रदूषणाविषयी सामाजिक माध्यमांत प्रसारित केलेल्या एका संदेशात (‘पोस्ट’) म्हणतात, ‘‘नरकासुर प्रतिमांचे प्रदर्शन करतांना अत्याधुनिक ध्वनीक्षेपकाचा वापर करून मोठ्या आवाजात रात्री उशिरापर्यंत पाश्चात्त्य संगीत लावण्यात आले. यामुळे रक्तदाब आणि हृदयरोग यांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना बराच त्रास झाला.’’