हिंदूंनो, आंतरिक दिवाळी साजरी करूया !

आपण दिवाळी तेलाच्या दिव्यांची रांग लावून साजरी करत असतो. असे असले, तरी या वर्षीपासून आपण आंतरिक दिवाळी साजरी करूया. त्यासाठी खर्च करावा लागत नाही; पण लाभ भरपूर आहेत.

आंतरिक दिवाळी म्हणजे मनमंदिरातील दिवाळी ! मनमंदिरात ज्ञानाचे दीप लावणे आणि स्वतःचे नरकासुररुपी दोष अन् रावणरुपी अहं घालवणे, भावाच्या रांगोळ्या घालणे, प्रीतीची मिठाई वाटणे, सर्व देवतांना आपल्या हृदयसिंहासनावर स्थापन करणे, भक्तीचे कंदील लावणे, मन आनंदी आणि निर्मळ ठेवणे. असे करणे म्हणजेच आंतरिक दिवाळी साजरी करणे होय.

आंतरिक दिवाळी समाजातील प्रत्येक घटकाने साजरी करण्यास प्रारंभ केला, तर आपण खर्‍या अर्थाने सुखी होणार आहोत. समाजातील एकमेकांविषयीची द्वेषाची भावना दूर होऊन सामंजस्य निर्माण होईल. यातूनच पुढे एकमेकांमधील ईश्वरी तत्त्वाचा सन्मान करायला शिकता येईल. सर्वत्र संघभावना आणि संघशक्ती निर्माण करूया, जेणेकरून हिंदू समाजाकडे वाकडी दृष्टी करून पहाण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही. दिवाळीच्या निमित्ताने सर्व वाईट गोष्टी आणि धूर्त वृत्तीचा त्याग करूया. मांगल्याची कास धरून उर्वरित जीवन सुखमय आणि समृद्ध घडवूया.

दसरा-दिवाळी सण । येते आनंदाला उधाण ।।

काढूया भारतमातेची आठवण । वेळ आणि धन करूया अर्पण ।।

होईल हिंदु राष्ट्राची निर्मिती । अन भारतमातेचे रक्षण ।।

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा. (१.११.२०२१)