देशभरातील गुन्ह्यांची वाढती संख्या आणि गुन्हेगारीचे पालटते स्वरूप लक्षात घेता पोलीस अधिकार्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रामाणिकपणे वाटते. गुन्ह्यांचे जलद गतीने अन्वेषण करून गुन्हेगारांपर्यंत पोचणे, हे काही वेळा पोलिसांसमोर आव्हान असते. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांना आवश्यक असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे, त्यांच्या साधनसुविधेत वाढ करणे आवश्यक आहे. त्याखेरीज राजकीय दबावापासूनही पोलिसांना अलिप्त ठेवायला हवे. कायद्यानुसार आपले काम चोख बजावत असलेल्या पोलीस अधिकार्यांच्या कामात राजकारणी लोकांनी ढवळाढवळ केल्यास राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. स्वतःचा जीव धोक्यात घालून गुन्हेगारांना कह्यात घेणार्या पोलिसांचा सत्कार करायलाच हवा; पण कामात दिरंगाई करणार्या वा निष्क्रियता दाखवणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी, हेही तितकेच आवश्यक आहे. आपला देश आणि आपल्या देशातील जनतेची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.
– श्री. विजयसिंह आजगांवकर, फोंडा, गोवा.