दिवाळी सात्त्विक पद्धतीने साजरी करण्याच्या पद्धती

‘संपूर्ण भारतात दिवाळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात; परंतु धर्मशिक्षणाचा अभाव असल्याने आज हिंदु सण आणि उत्सव सात्त्विक पद्धतीने साजरे केले जात नाहीत; म्हणून आजपासून आपण दिवाळी सात्त्विक पद्धतीने कशी साजरी करू शकतो ? याविषयी काही माहिती जाणून घेणार आहोत.

पू. तनुजा ठाकूर

१. दिवाळीत मेणबत्तीचा वापर न करता पणत्या लावाव्यात !

१ अ. मेणबत्तीची निर्मिती

१ अ १. मेणबत्तीमध्ये तमोगुणी पदार्थांचा वापर होत असणे : ‘सध्या अनेक हिंदू दिवाळीत तेलाचे दिवे न लावता मेणबत्ती लावतात. मेणबत्तीची प्रथम निर्मिती आणि उपयोग चीनमध्ये झाला’, असे म्हटले जाते. त्या वेळी तिची निर्मिती करतांना व्हेल माशाची चरबी वापरली जात होती. त्यानंतर युरोपमध्ये नैसर्गिक चरबी (प्राण्यांपासून मिळवलेली चरबी) आणि मेण यांपासून मेणबत्तीची निर्मिती होऊ लागली अन् आता ‘पॅराफिन’ मेणापासून मेणबत्त्या बनवल्या जातात. मेणबत्ती तमोगुणी असल्यामुळे भारतीय संस्कृतीत मेणबत्तीचा वापर निषिद्ध मानला जातो.

१ आ. मेणबत्तीच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम : मेणबत्ती बनवण्यासाठी वापरलेले सर्व पदार्थ तमोगुणी असल्यामुळे तिचा प्रकाशही तमोगुणी असतो. सध्या पेठेत उपलब्ध असलेल्या रंगीबेरंगी, निरनिराळे आकार आणि सुगंध असणार्‍या मेणबत्त्या मायावी अन् वाईट शक्ती यांना पटकन आकर्षित करतात. घर आणि त्याचा परिसर यांमध्ये अशा तमोगुणी मेणबत्त्या लावल्यास ‘घरात तमोगुणी लहरी येतात अन् वर्षभर घरात कलह, क्लेश, रोग, दुःख, आर्थिक हानी इत्यादी त्रास होतात’, हे लक्षात घ्या.’

१ इ. उपाय

१ इ १. दीपावलीत स्वतःचे घर मातीच्या सात्त्विक दिव्यांच्या ओळीने सजवून देवतांचे तत्त्व आकृष्ट करावे ! : दीपावलीचा अर्थ ‘दिव्यांची ओळ’, असा आहे. दीपावलीच्या वेळी मेणबत्त्या लावल्या जात असत्या, तर तिचे नाव ‘मेणबत्त्यावली’, असे झाले असते. तमोगुणी मेणबत्तीचा उपयोग केवळ दिवाळीतच नव्हे, तर इतर वेळीसुद्धा करणे टाळावे. दिवाळीत ओळीने दिवे लावावेत. त्यामुळे श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व आकृष्ट होते आणि घरातील सुख-समृद्धीमध्ये वाढ होते. सत्त्वगुणी वैदिक आर्य हे प्रकाशासाठी नेहमीच तूप किंवा तेल असलेल्या दिव्यांचा वापर करत आले आहेत; म्हणून या दीपावलीत स्वतःचे घर मातीच्या सात्त्विक दिव्यांनी सजवून देवतांचे तत्त्व आकृष्ट करावे.

२. परदेशातील भारतीय लोकांना मातीचे दिवे मिळत नसल्यास त्यांनी पितळ्याचे दिवे लावावेत !

जे हिंदू विदेशात रहातात आणि त्या ठिकाणी त्यांना मातीचे दिवे मिळत नाहीत, ते केवळ पितळ्याचे पाच दिवे लावावेत. ते मातीचे दिवे घरीसुद्धा बनवू शकतात किंवा ‘ऑनलाईन’ (माहितीजालाद्वारे) विकत घेऊ शकतात. जे हिंदू भारतात येतात, ते जातांना पितळ्याचे ५ किंवा ११ दिवे घेऊन जाऊ शकतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये धर्मपालन करून सात्त्विक पद्धतीने सण साजरा करण्याची इच्छा असली पाहिजे.

३. दिवाळीत घरात ५ दिवे कुठे लावावेत ?

काही कारणास्तव आपण घरात केवळ पाचच दिवे लावणार असू, तर एक दिवा देवघरात, एक तुळशी वृंदावनाजवळ, एक घराच्या उंबरठ्यावर, एक घराच्या मागील बाजूस आणि एका घराच्या मध्यभागी लावावा.

४. दिवा ‘रॉकेल’ किंवा ‘रिफाईंड’ तेल यांचा न लावता तीळ तेल किंवा अन्य खाद्यतेलाचा असावा !

देवघर आणि तुळस या ठिकाणी तुपाचा दिवा लावावा. घरामध्ये तूप उपलब्ध नसेल किंवा तूप विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती नसेल, तर देवघर आणि तुळस या ठिकाणी लावायच्या दिव्यांमध्ये तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो. उर्वरित ठिकाणी (घराच्या परिसरात) लावायच्या दिव्यांमध्येही रॉकेल किंवा ‘रिफाईंड’ तेल न घालता इतर कोणत्याही खाद्यतेलाचा उपयोग करावा. रॉकेल तमोगुणी असल्याने त्याचा उपयोग करू नये. कितीतरी गावांत दिव्यांमध्ये अशा प्रकारचे तमोगुणी पदार्थ वापरले जात असल्याचे मला आढळले.’

– पू. तनुजा ठाकूर (२६.१०.२०२१)