पुरोहितांनी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार त्रिवेंद्रसिंह रावत यांना दर्शन घेण्यापासून रोखले !

चारधाम मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे प्रकरण

यावरून मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात हिंदूंच्या भावना किती तीव्र आहेत, हे लक्षात येते ! केंद्र आणि सर्व राज्य सरकारे आता तरी मंदिरे भक्तांच्या कह्यात देतील का ?

चारधाम तीर्थक्षेत्राचे सरकारीकरण

केदारनाथ (उत्तराखंड) – उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार त्रिवेंद्रसिंह रावत येथे दर्शनासाठी आले असता त्यांना येथील पुरोहित समाजाने दर्शन घेण्यापासून रोखले. चारधाम मंदिरांचे सरकारीकरण करण्याच्या राज्यातील भाजप सरकारच्या प्रयत्नांना पुरोहित समाजाचा विरोध आहे. पुरोहितांनी रावत यांना येथील संगमाजळील पुलाच्या पुढे येऊ देण्यास विरोध केला. या वेळी घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे रावत यांना मंदिरात दर्शन न घेताच शासकीय विश्रामगृहात जावे लागले. पुरोहितांचे म्हणणे आहे, ‘रावत यांनीच सरकारीकरणाचा कायदा आणला आहे.’

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार त्रिवेंद्रसिंह रावत

या घटनेच्या एक दिवस आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक आणि राज्याचे मंत्री धनसिंह रावत हेही दर्शनासाठी आले असता त्यांनाही पुरोहितांकडून विरोध करण्यात आला होता. उत्तराखंड सरकारने यापूर्वी पुरोहितांना मंदिर सरकारीकरणाचा हा प्रस्तावित कायदा रहित करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र अद्याप हे आश्‍वासन न पाळल्याने पुरोहितांमध्ये भाजप सरकारच्या विरोधात रोष आहे.