उत्तर महाराष्ट्रात ४ कोटी ६० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

  • महाराष्ट्राचा ‘पंजाब’ तर होत चालला नाही ना ? – संपादक
  • अमली पदार्थांचा व्यापार आणि व्यसन यांचे पाणी डोक्यावरून वाहून गेल्यावर कारवाई करणारे प्रशासन काय कामाचे ? एवढा मोठा व्यापार वाढेपर्यंत पोलीस काय करत होते ? अमली पदार्थांच्या विक्रेत्यांची ठिकाणे रस्त्यांतून जाणार्‍या सामान्यांना लक्षात येतात, ती पोलिसांना माहीत नाहीत, असे कसे होईल ? – संपादक
अमली पदार्थां सह पोलिस

नाशिक – विभागातील नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक ग्रामीण या ५ जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात गेल्या दीड मासात विशेष मोहीम राबवण्यात आली. यात २२ प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यात एकूण ३८ आरोपींचा समावेश आहे. या कारवाईत ४ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत मिळालेल्या शस्त्रांचा मुख्य पुरवठादार असलेला आरोपी सतनाम सिंह यालाही पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून काही काडतुसे आणि मॅगझिन्स यांसह दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात अमली पदार्थांवर मोठी कारवाई केली असून ४ कोटी २८ लाख रुपयांचा ५ सहस्रांहून अधिक किलो गांजा जप्त केला आहे. याशिवाय ७ लाख रुपये किमतीच्या आसपास ब्राऊन शुगर आणि अनुमाने २ लाख रुपयांचे चरस पोलिसांनी जप्त केले आहे. गेल्या वर्षभरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत ३६ पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण ४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.