फोंडा, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – दीपावली सण साजरा करतांना नरकासुराला अधिक महत्त्व न देता जगण्याचा मंत्र देणार्या श्रीकृष्णाच्या पूजनाला अधिक महत्त्व द्यावे. मानवतेचे शिक्षण, धर्म, संस्कृती आणि परंपरा समृद्ध करण्यासाठी युवकांनी संघटित होणे आवश्यक आहे. बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानात साजरा होणार्या ‘दीपोत्सव २०२१’ या कार्यक्रमात सहभागी होऊन पारंपरिक सण आणि उत्सव यांची परंपरा शिकून घ्यावी, असे आवाहन ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले. महालक्ष्मीनगर, तळावली येथे सरक्षंक भिंत आणि साकव दुरुस्तीच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आमदार श्री. सुदिन ढवळीकर बोलत होते. या वेळी त्यांच्या हस्ते संरक्षक भिंत आणि साकवाच्या दुरुस्तीकामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी इतरांचीही भाषणे झाली.