गडचिरोली – जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारतांना अशा धमक्या येण्याची शक्यता मी आधीच गृहित धरली होती. नक्षलवाद्यांच्या धमक्यांना मी स्वतः भीक घालत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी मी सतत प्रयत्नशील असून विकास हेच नक्षलवाद समाप्तीचे प्रमुख लक्षण आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना आता ते समजून चुकले आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना कुणीही सहकार्य करत नाही. अशा परिस्थितीत धास्तावलेल्या नक्षलवाद्यांची ही भ्याड कृती आहे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री तथा गडचिरोली आणि ठाणे या जिल्ह्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. येथे विविध कार्यक्रमांसाठी आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
शिंदे यांना भामरागड तालुक्यातून धमकीचे पत्र आले होते. त्या तालुक्यातील अतीदुर्गम आणि शेवटच्या टोकावर असलेल्या धोडराज पोलीस साहाय्य केंद्राला भेट देऊन त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. गडचिरोली पोलीस दलाच्या ‘दादालोरा खिडकी’ या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी पोलिसांचे अभिनंदन केले.
३० ऑक्टोबर या दिवशी शिंदे यांनी पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून मत्स्यपालन, भाजीपाला आणि फळबाग लागवड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र आणि दुचाकी अन् चारचाकी वाहनांची ओळखपत्रे यांचे वाटप केले. कोरोनाच्या काळात सर्वोत्तम काम करणार्यांचा सत्कार आणि आत्मसमर्पितांना भूखंड वाटपाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे या वेळी म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना आत्मनिर्भर करणे आणि आत्मसमर्पितांचे पुनर्वसन करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणे, यासाठी पोलीस आणि प्रशासन यांचे प्रयत्न आहेत.