आध्यात्मिक त्रासाशी लढून आणि ऐकण्याच्या अन् बोलण्याच्या मर्यादांवर मात करून संतपद गाठणार्‍या फ्रान्समधील ४१ वर्षे वयाच्या एकमेवाद्वितीय पू. (सौ.) योया वाले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास, तसेच ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता अल्प असूनही मॉडेलिंगचा व्यवसाय सोडून संत झालेल्या मूळच्या युरोप येथील पू. योया सिरियाक वाले या जगातील अशा एकमेवाद्वितीय संत आहेत. त्यांच्यात सूक्ष्मातून पहाण्याची आणि दिसलेल्याची चित्रे काढण्याची अफाट क्षमता आहे. त्यांनी काढलेले सूक्ष्म चित्र पाहिल्यावर समाजातील लोकांना एखादी गोष्ट किंवा एखाद्या घटनेच्या वेळी ‘सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया होत असते ?’, हे समजते. त्यांच्या चित्रांनी प्रभावित होऊन अनेक जिज्ञासूंनी साधनेला आरंभ केला आहे.

सौ. योया यांनी वर्ष २०१३ मध्ये संतपद प्राप्त केले; पण मध्यंतरी आध्यात्मिक त्रासात तीव्र वाढ झाल्याने त्यांची आध्यात्मिक पातळी न्यून झाली होती. आता त्यांनी केलेल्या उपायांनी अनिष्ट शक्तींचा त्रास उणावल्याने, तसेच भावाच्या स्थितीत राहून सेवा केल्याने त्यांची पातळी पुन्हा ७१ टक्के झाली आहे. जिज्ञासा, शिकण्याची वृत्ती, प्रीती, त्याग, अल्प अहं आदी गुणांचा समुच्चय असलेल्या सौ. योया ‘समष्टी संत’ म्हणून ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संतपदी विराजमान झाल्या आहेत. तीव्र तळमळ असली की, एखादी व्यक्ती सर्व अडथळ्यांवर मात करून कशी प्रगती करू शकते, याचा त्यांनी सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे.

पू. योया यांच्या साधना प्रवासात त्यांना पूर्वायुष्यात मॉडेल असलेले आणि आताचे एस्.एस्.आर्.एफ्.चे सद्गुरु सिरियाक वाले यांची पती म्हणून मौलिक साथ लाभली. ते सध्या एस्.एस्.आर्.एफ्. या आध्यात्मिक संघटनेचे मार्गदर्शक म्हणून जर्मनीत कार्यरत आहेत. वर्ष २००९ मध्ये त्या, त्यांचे पती आणि मुलगी (कु. अनास्तासिया, तेव्हाचे वय ५ वर्षे) यांच्यासह रामनाथी आश्रम, गोवा, भारत येथे रहाण्यास आल्या. त्यांची मुलगी कु. अनास्तासिया हीसुद्धा दैवी बालिका आहे. तिची व्यष्टी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.

पू. योया यांचे बंधू पू. देयान हेही जुलेै २०१९ पासून भारतात साधनेसाठी रहाण्यास आले आहेत. त्यांनीही वर्ष २०२० मध्ये संतपद गाठले आहे.

पू. (सौ.) योया वाले, त्यांचे पती सद्गुरु सिरियाक वाले आणि मुलगी कु. ॲनास्तासिया, तसेच रामनाथी आश्रमात रहाणारे बंधू पू. देयान हे दैवी कुटुंब लवकरच पुढील प्रगती जलद गतीने करतील, याची मला खात्री आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३०.१०.२०२१)