दीपावलीच्या सणांचे महत्त्व आणि त्या दिवशी करायच्या धार्मिक कृती

वसुबारस (गोवत्स द्वादशी)

१. तिथी : आश्विन कृष्ण पक्ष द्वादशी

२. इतिहास : समुद्रमंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

३. उद्देश :  या अन् पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरिरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.

४. सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सवत्स गायीची पूजा करतात.


धनत्रयोदशी

१. तिथी : आश्विन कृष्ण पक्ष त्रयोदशी

२. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.

३. भावार्थ

‘ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची पूजा करतात. येथे ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नि आणि सूर्य यांना धनच म्हटले आहे. अलक्ष्मीमुळे अनर्थ घडतो. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा जमाखर्च द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शेष राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. पैसा कष्टाचा, धवलांकित असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी खर्च करावा, असे शास्त्र सांगते.’

– (परात्पर गुरु) पांडे महाराज

४. धन्वन्तरि जयंती

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वन्तरि जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वन्तरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वन्तरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. या दिवशी तोच धन्वन्तरि प्रसाद म्हणून देण्यात येतो.

५. यमदीपदान

अकाली मृत्यू कुणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (काही जण तेरा दिवे लावतात) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील प्रार्थना करावी – ‘धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंड यातून माझी सुटका करावी.’


नरक चतुर्दशी

१. तिथी : आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी

२. इतिहास

‘श्रीमद्भागवतपुराणात एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर (नरकासुर) नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. श्रीकृष्णाला हे समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार मारून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी आला. त्यानंतर मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.’

३. सण साजरा करण्याची पद्धत

अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत आणि पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

आ. यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.


लक्ष्मीपूजन

१. तिथी : आश्विन अमावास्या

२. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते.

अमावास्या : ‘या दिवशी दिव्यांचा झगमगाट शोभून दिसतो. त्यामुळेच अमावास्या ही पवित्र झाली आहे. शरदऋतूतील आश्विन मासातील पौर्णिमा तशीच ही अमावास्याही कल्याणकारी आहे. सर्व समृद्धीदर्शक आहे.’

– (परात्पर गुरु) परशराम पांडे महाराज

३. इतिहास

या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

४. सण साजरा करण्याची पद्धत

‘प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध, ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवांनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा या दिवसाचा विधी आहे.

४ अ. लक्ष्मीपूजन

एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून सिद्ध केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

४ आ. श्री लक्ष्मीदेवीला करायची प्रार्थना

लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभरातील जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि श्री लक्ष्मीदेवीला प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे. माझे भरणपोषण करण्यासाठी मला चैतन्य देणारा, माझ्या प्रत्येक कार्यात सहभागी असलेला भगवंत माझ्यात राहून कार्य करतो. हे लक्ष्मीदेवी आणि सरस्वतीदेवी, तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि माझ्या हातून जन्मभर हितकारक असाच विनियोग होऊ द्या’

४ इ. लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन

आश्विन अमावास्येस लक्ष्मी आणि कुबेर या देवतांचे पूजन सांगितले आहे. लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे, तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक आहे. कुबेर ही देवता ‘पैसा कसा राखावा ?’, हे शिकवणारी आहे, कारण तो धनाधिपती आहे; म्हणून या पूजेसाठी लक्ष्मी आणि कुबेर या देवता सांगितलेल्या आहेत. विशेषतः व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात करतात.

४ ई. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात.

४ ए. अहंभाव आणि मलीनता नाहीशी करण्यासाठी श्री लक्ष्मी अन् श्री सरस्वती यांचे पूजन करावे.

४ ऐ. हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. (हातातील पलिता दक्षिण दिशेकडे दाखवून पितृमार्गदर्शन करतात.) ब्राह्मण आणि अन्य क्षुधापीडित यांना भोजन देतात.

४ ओ. अलक्ष्मी निःसारण

१. महत्त्व : गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.

२. कृती : ‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

लक्ष्मी कुणाकडे वास करते ?

आश्विन अमावास्येच्या रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, तसेच क्षमाशील पुरुष आणि गुणवती अन् पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.


‘श्री लक्ष्मी पूजाविधी’ पुढील मार्गिकेवर उपलब्ध आहे.

www.sanatan.org/mr/a/785.html

बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)

१. तिथी : कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा

२. महत्त्व

हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.

३. सण साजरा करण्याची पद्धत

अ. बलीप्रतिपदेच्या दिवशी भूमीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी  विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप आणि वस्त्रे यांचे दान करतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात.

आ. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. कृष्ण, इंद्र, गायी आणि वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

इ. ‘बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्यभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवतात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने अनुमती दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात.

पाडव्याला पतीला ओवाळण्यामागील आध्यात्मिक महत्त्व काय ?

या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. ओवळल्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रकट होते.

भाऊबीज (यमद्वितीया)

१. तिथी : कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया

२. इतिहास : या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ म्हणतात.

३. महत्त्व : अ. अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.

आ. ‘या दिवशी यमराज त्याची बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो आणि त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.

इ. यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे : अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते.

ई. बहिणीने भावाला ओवाळणे : या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे.अन्य कोणत्याही स्त्रीला  औक्षण करतांना होणारे सूक्ष्मातील परिणाम

१. भाऊबिजेच्या दिवशी भावाला ओवाळतांना स्त्रीमध्ये वात्सल्यभाव अधिक कार्यरत असतो.

२. औक्षणाच्या वेळी भावाच्या श्वसनक्रियेतून त्याच्या देहात तेजतत्त्वाचे कण प्रवाहित होतात. त्यामुळे त्याच्या आयुष्यात वाढ होते, तसेच त्याच्या देहाभोवती संरक्षक-कवचही निर्माण होते.

३. औक्षण करतांना बहिणीमध्ये अप्रकट स्वरूपात असलेली शक्तीची स्पंदने प्रकट स्वरूपात कार्यरत होऊन त्यांचे भावाकडे प्रक्षेपण होते. त्यामुळे भावाला कार्यशक्ती प्राप्त होते.

४. भाऊबिजेच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी जाऊन केवळ बहिणीच्या हातचे अन्न ग्रहण करावे, असे सांगितले जाते. असे केल्याने भाऊ आणि बहीण यांच्यातील मायेच्या नात्यामुळे निर्माण झालेल्या देवाण-घेवाण हिशोबाचे प्रमाण न्यून होते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, गोवा. (२७.६.२०११)