पू. पंडित केशव गिंडे आणि त्यांनी बनवलेली ‘केशववेणू’ या बासरीचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘पुणे येथील सुप्रसिद्ध वेणूवादक पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात २०.१०.२०२१ या दिवशी शुभागमन झाले होते आणि त्यांचे आश्रमात तीन दिवस वास्तव्य होते. या कालावधीत त्यांनी वेणूवर विविध राग वाजवून त्यांची कला सादर केली. त्या वेळी देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

१. पू. पंडित केशव गिंडे यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

१ अ. पू. गिंडेगुरुजींनी संतांच्या कुळात जन्म घेतल्याचे जाणवणे : १९.१०.२०२१ या दिवशी पू. केशव गिंडेगुरूजींना पाहिल्यावर माझ्या मनात असा विचार आला की, त्यांचे कुळ अत्यंत सात्त्विक आणि भक्तीमय असून ‘ते संतांच्या कुळातच जन्माला आले आहेत.’

(पू. केशव गिंडेगुरुजी यांच्या मागील पिढ्यांमध्ये काही संत जन्माला आले आहेत. – संकलक)

१ आ. पू. गिंडेगुरुजींच्या ठिकाणी मुरलीधर श्रीकृष्णाचे दर्शन होणे : पू. गिंडेगुरुजींना पाहिल्यावर त्यांच्या ठिकाणी मुरलीधर श्रीकृष्णाचे दर्शन झाले. (पू. गिंडेगुरूजींचे गुरु (कै.) सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी पू. गिंडेगुरुजींना पाहिल्यावर असे म्हटले होते की, ‘हा तर कृष्णाची वेणू घेऊन जन्माला आलेला आहे.’ – संकलक)

१ इ. पू. गिंडेगुरुजींच्या ठिकाणी विठ्ठलाचे दर्शन होणे : पू. गिंडेगुरुजींचे वेणूवादन चालू असतांना मला त्यांच्या ठिकाणी श्रीविठ्ठलाचे दर्शन झाले. (पू. गिंडेगुरुजींच्या घराण्यात वारकरी संप्रदायाप्रमाणे साधना करण्याची परंपरा आहे आणि ते श्रीकृष्णासह विठ्ठलाचेही उपासक आहेत. – संकलक)

पू. पंडित केशव गिंडे

१ ई. पू. गिंडेगुरुजींनी विविध योगमार्गांनुसार साधना केलेली असणे

१ उ. भक्तीयोगानुसार साधना केल्यामुळे संतपद प्राप्त केलेले असणे : पू. गिंडेगुरुजींना लहानपणापासूनच वेणूवादन करण्याची आवड होती. त्यांनी आयुष्यभर केवळ ईश्वरप्राप्तीसाठी वेणूवादन करून संतपद प्राप्त केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सतत भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येते.

१ ऊ. ध्यानयोगानुसार साधना केल्यामुळे तपस्वींप्रमाणे तेजस्वी असणे : जेव्हा ते वेणूवादन करतात, तेव्हा ते पूर्णपणे एकाग्र झाल्यामुळे भावसमाधी अनुभवत असतात. ते जागृत भावसमाधी अवस्थेत असूनही डोळे उघडे ठेवून वेणूवादन करतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

१ ए. ज्ञानयोगानुसार साधना केल्यामुळे त्यांच्यात संशोधक वृत्ती असणे आणि ते परमज्ञानी असणे : त्यांना वेणू आणि संगीत यांचे पुष्कळ ज्ञान आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या गुरूंच्या कृपेमुळे त्यांना आत्मज्ञानही प्राप्त झालेले आहे. ते परमज्ञानी असूनही अत्यंत विनम्र आहेत. त्यांच्यामध्ये संशोधकवृत्ती असल्यामुळे ते सतत प्रयोग करत असतात.

१ ऐ. कर्मयोगानुसार साधना केल्यामुळे समाजाच्या कल्याणासाठी निरपेक्ष भावाने वेणूवादन करणे : पू. गिंडेगुरुजी त्यांचे वेणूवादन समाजाच्या कल्याणासाठी म्हणजे, वेणूतून विकलांग आणि मतिमंद व्यक्तींवर ठिकठिकाणी जाऊन वेणूवादन करून आध्यात्मिक स्तरावरील उपाय करतात. त्यामुळे काही रुग्णांमध्ये सुधारणा झालेली आहे. अशाप्रकारे ते निरपेक्षभावाने वेणूवादनाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करतात. यातून त्यांची कर्मयोगानुसारही साधना चालू असते.

बासरीवादन करतांना पू. पंडित केशव गिंडे

१ ओ. वेणूवादनातून नादब्रह्माची अनुभूती येणे : त्यांची वेणूवादनाच्या माध्यमातून नादब्रह्माची उपासना पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या वेणूवादनातून नादब्रह्म साकार होऊन त्यांनी वाजवलेला केशववेणू ऐकत असतांना नादब्रह्माची अनुभूती येते.

१ औ. बालकभाव असणे : पू. केशव गिंडेगुरुजी यांचे मन पुष्कळ निर्मळ आणि लहान मुलाप्रमाणे निरागस असल्यामुळे त्यांच्यामध्ये बालकभाव जाणवला. त्यांच्या मुखावरील भाव आणि पायांच्या बोटांची ठेवण लहान मुलाप्रमाणे आहे.

१ अं. पू. गिंडेगुरुजींच्या भावामुळे त्यांच्या समवेत त्यांच्या आध्यात्मिक गुरूंचे अस्तित्व जाणवणे : पू. गिंडेगुरुजी हे गुरुपदावर असूनही त्यांच्यामध्ये विनम्रभाव आणि शिष्यभाव सतत जागृत असल्यामुळे त्यांच्या समवेत त्यांचे आध्यात्मिक गुरु पुणे येथील (कै.) प.पू. गुळवणी महाराज आणि नगर जिल्ह्यातील (कै.) सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे सूक्ष्मातील अस्तित्व नेहमी जाणवते.

१ क. पू. गिंडेगुरुजींमध्ये चैतन्य कार्यरत असल्यामुळे त्यांची कांती पिवळसर रंगाची झालेली असणे : पू. गिंडेगुरुजींच्या मनाची निर्मळता आणि त्यांचा श्रीकृष्णाप्रती असलेल्या भाव यांच्यामुळे त्यांना ईश्वराचे चैतन्य पुष्कळ प्रमाणात ग्रहण करता येते. त्यामुळे त्यांची कांती चैतन्याच्या प्रभावामुळे पिवळसर रंगाची दिसते.

१ ख. पू. गिंडेगुरूजींमध्ये श्रीकृष्णाचे तत्त्व कार्यरत होणे : पू. गिंडे गुरुजींमधील भाव आणि तळमळ यांच्यामुळे त्यांच्यामध्ये श्रीकृष्णाचे ७ टक्के कृष्णतत्त्व जाणवते. त्यांच्यातील भावामुळे त्यांच्याकडे श्रीकृष्णाचे तत्त्व आकृष्ट होते आणि त्यांच्यातील तळमळीमुळे त्यांच्यातील कृष्णतत्त्व दीर्घकाळ जागृत रहाते.

१ ग. वेणूवादनामुळे सात्त्विक नादाची निर्मिती होऊन वातावरणाची शुद्धी होणे : वेणूवादनामुळे पू. गिंडेगुरुजींनी भावपूर्णरित्या वेणूवादन केल्यामुळे त्यांच्या वेणूवादनातून सात्त्विक नादाची निर्मिती होऊन वातावरणाची शुद्धी होते. ‘ते अखंड भावावस्थेत राहून वेणूवादन आणि दिवसभरातील कृती करत असतात’, असे जाणवले.

१ घ. पू. गिंडेगुरुजींच्या वेणूवादनाच्या वेळी राग-रागिण्यांनी त्यांच्याभोवती सूक्ष्मातून नृत्य करणे : जेव्हा ते वेणूवादन करत होते, तेव्हा पांढर्‍या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या राग-रागिण्या सूक्ष्मातून प्रगट झाल्या आणि त्यांनी पू. गिंडेगुरुजींच्या भोवती फेर धरून सात्त्विक नृत्य केले. तेव्हा वातावरणात पुष्कळ प्रमाणात आनंद जाणवत होता.

१ च. पू. गिंडेगुरुजींच्या भोवती जनलोकाचे नादमय वायुमंडल कार्यरत असणे : पू. गिंडेगुरुजी संत असल्यामुळे त्यांच्याभोवती जनलोकाचे नादमय वायुमंडल कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या सहवासात असतांना दिव्य नादाची अनुभूती येते आणि त्यांच्याकडून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होऊन आध्यात्मिक लाभ होतात.

१ छ. पू. गिंडेगुरुजींनी पारंपरिक वेणू आणि केशववेणू वाजवल्यावर त्यांत जाणवलेला भेद : पू. गिंडेगुरुजी स्वतः संत आणि त्यांच्यात भाव असल्यामुळे पारंपरिक भारतीय वेणू अन् केशववेणू या दोन्ही प्रकारच्या वेणू ते उत्तमरित्या वाजवतात आणि दोन्ही प्रकारच्या वेणूतून दैवी नादाची अनुभूती येते. पारंपरिक वेणूच्या तुलनेत केशववेणू मधून सात्त्विक नादाची निर्मिती अधिक प्रमाणात होते आणि त्यातून अधिक प्रमाणात चांगली स्पंदने वायुमंडलात प्रक्षेपित होतात.

१ ज. पू. गिंडेगुरुजींच्या सहवासात स्थळ आणि काळ यांचे भान न रहाणे : पू. गिंडेगुरुजींकडून चैतन्य आणि आनंद यांच्या लहरींचे सतत प्रक्षेपण होऊन त्यांच्या सहवासात उत्साह अन् आनंद जाणवतो. त्यामुळे त्यांच्या सहवासात स्थळ आणि काळ यांचे भान रहात नाही अन् ‘काळ कसा जातो’, हेही कळत नाही.

१ झ. ऋषींप्रमाणे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्धही असणे : पू. गिंडेगुरुजींनी ऋषींप्रमाणे नादब्रह्मरूपी श्रीकृष्णाच्या निर्गुण रूपाची दीर्घकाळ कठोर साधना केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये तपोबल वाढले आहे. ते केवळ वयोवृद्धच नसून ऋषींप्रमाणे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्धही आहेत.

१ ट. पू. गिंडेगुरुजींकडून निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याच्या शीतल लहरींचे सर्वत्र प्रक्षेपण होणे : पू. गिंडेगुरुजी वेणूच्या नादातून परब्रह्माशी अनुसंधान साधतात आणि अखंड भावावस्थेत असतात. त्यांच्या नादानुसंधानामुळे त्यांच्याकडे श्रीकृष्णाच्या निर्गुण रूपाचे चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट होते. त्यामुळे त्यांच्याकडून वातावरणात निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्याच्या शीतल लहरींचे सर्वत्र प्रक्षेपण होते.

२. पू. केशव गिंडेगुरुजींनी बनवलेल्या ‘केशववेणू’ची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

कु. मधुरा भोसले

२ अ. केशववेणू दैवी असणे : केशववेणूमध्ये श्रीकृष्णाच्या वेणूतील ७ टक्के इतके तत्त्व आहे. त्यामुळे ही वेणू सर्वसामान्य वेणू नसून ती दैवी असल्याचे जाणवते.

२ आ. केशववेणू सजीव असल्याचे जाणवणे : पू. गिंडेगुरुजींमधील भक्तीभावामुळे त्यांची वेणू निर्जीव नसून ती सजीव असल्याप्रमाणे जाणवते. तिला पाहिल्यावर तिच्यामध्ये देवत्व जागृत असल्याचे जाणवते.

२ इ. केशववेणूमध्ये प्रथम निर्गुणस्वरूप ‘ॐ’ काराचा नाद आणि त्यानंतर सप्तस्वर प्रगट होणे : पू. गिंडेगुरुजींनी वेणूवादन करण्यास आरंभ करण्यापूर्वी त्यांच्या पाठीमागे त्यांचे गुरु, भगवान श्रीकृष्ण आणि माता सरस्वती यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवते. ते वेणूवादनाला आरंभ करण्यापूर्वी मनोमनी भगवंताला वंदन करतात. तेव्हा त्यांच्या वेणूमध्ये ‘ॐ’ चा ध्वनी सूक्ष्मातून प्रगट होतो, म्हणजे वेणूकडे निर्गुण स्तरावरील दैवी नादाच्या लहरी आकृष्ट होतात. त्यानंतर जेव्हा ते त्यांच्या गुरूंचे स्मरण करतात, तेव्हा त्यांच्या भक्तीभावावर प्रसन्न होऊन त्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होते. त्यामुळे वेणूमध्ये आकृष्ट झालेल्या निर्गुणस्वरूप ‘ॐ’ कार नादाचे रूपांतर सप्तस्वरांमध्ये होते. तेव्हा मला असे जाणवले की, ‘सप्तस्वरांनी देवतांचे सगुण रूप धारण करून त्यांना वंदन केले आहे.’ जेव्हा ते वेणूवादन आरंभ करतात, तेव्हा या सप्तस्वरांचे रूपांतर सप्तरंगांमध्ये होऊन ते वेणूच्या छिद्रांतून कारंज्याप्रमाणे प्रगट होऊन वायुमंडलात पसरतात. त्यामुळे वातावरणाची शुद्धी होते.

२ ई. केशववेणूच्या नादातून विविध राग आणि रागिण्या प्रगट होऊन त्यांनी दैवी नृत्य करणे : ते वेणूवादन करत असतांना वेणूच्या नादातून विविध राग आणि रागिण्या प्रगट झाल्या. त्यांनी पू. गिंडेगुरुजींना भावपूर्णरित्या वंदन केले. त्यांनी दैवी वस्त्रे आणि अलंकार परिधान केले होते. त्यामुळे त्यांच्या देहातून दैवी प्रकाश बाहेर पडत होता. पू. गिंडेगुरुजींनी केलेल्या भावपूर्ण वेणूवादनामुळे रागरागिण्यांनी प्रसन्न होऊन पू. गुरूजींच्या भोवती फेर धरून दैवी नृत्य केले. एकीकडे पू. गिंडेगुरुजींच्या सात्त्विक वेणुच्या सात्त्विक नादाच्या चैतन्यात माझे मन चिंब भिजले होते, तर दुसरीकडे सूक्ष्मातून चालू असलेले दैवी नृत्य पाहून माझ्या मनाला आनंद जाणवत होता.

२ उ. केशववेणूतून विविध प्रकारचे दैवी सुगंध येणे : पू. गिंडेगुरुजींच्या भावानुसार आणि त्यांनी वाजवलेल्या रागांनुसार त्यांच्या वेणूवादनातून विविध प्रकारचे दैवी सुगंध वायुमंडलात प्रक्षेपित होतात. त्यामुळे त्यांचे वेणूवादन ऐकत असतांना गुलाब, चंदन, मोगरा, हळद, चमेली, अष्टगंध किंवा कापूर यांचा सूक्ष्म गंध येतो. जेव्हा सप्तस्वर प्रगट होतात, तेव्हा वायुमंडलात ७ प्रकारचे दैवी सुगंध येतात. त्याचीच ही अनुभूती असल्याचे जाणवले.

२ उ १. सप्तस्वर आणि त्यांच्याशी संबंधित पंचतत्त्व आणि सप्तगंध

२ ए. केशववेणूतून आवश्यकतेनुसार श्रीकृष्णाच्या तारक आणि मारक अशा दोन्ही स्तरांवरील शक्ती वायुमंडलात प्रक्षेपित होणे : केशववेणूतून आवश्यकतेनुसार श्रीकृष्णाच्या तारक आणि मारक अशा दोन्ही स्तरांवरील शक्ती वायुमंडलात प्रक्षेपित होतात. जेव्हा या वेणूतून तारक शक्ती प्रक्षेपित होते, तेव्हा तिच्यातून शीतल लहरी वातावरणात पसरून भाव, चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येते. जेव्हा या वेणूतून मारक शक्ती प्रक्षेपित होते, तेव्हा तिच्यातून उष्ण लहरी वातावरणात पसरून तिच्यातून सुदर्शनचक्र सुटून वाईट शक्तींना लागते. त्यामुळे साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तींवर या सुदर्शनचक्राचा प्रहार होऊन त्यांचा जोर न्यून होतो आणि साधकांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन त्यांचा त्रास न्यून होतो.

२ ऐ. केशववेणूतून प्रक्षेपित झालेल्या मारक शक्तीमुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन वाईट शक्तींचा त्रास न्यून होणे : पू. गिंडेगुरुजींच्या ‘केशववेणू’ या वेणूमध्ये श्रीकृष्णाच्या बासरीचे ७ टक्के इतके तत्त्व आहे. त्यामुळे ते जेव्हा केशववेणू वाजवतात, तेव्हा तिच्यातून आवश्यकतेनुसार तारक किंवा मारक शक्ती वायुमंडलात प्रक्षेपित होते. त्यामुळे त्यांचे वेणूवादन ऐकत असतांना वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांवर आध्यात्मिक स्तरावर उपाय होऊन वाईट शक्तींना त्रास होतो, तर वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या साधकांना चैतन्य आणि आनंद यांची अनुभूती येते.

३. केशववेणूतील विविध घटक आणि त्यांचे प्रमाण (टक्के)

४. पारंपरिक वेणू आणि केशववेणू यांतील भेद

टीप – वेणूतील माधुर्याचे प्रमाण : या वेणूमध्ये सप्तस्वरांचा स्पष्ट उच्चार होऊन त्यातून विलंबित (संथ गतीचे), मध्य (मध्यम गतीचे) आणि द्रूत (जलद गतीचे) स्वर सहजरित्या प्रगट होतात. त्यामुळे पारंपरिक वेणूपेक्षा केशववेणूतील नाद अधिक मधुर असल्याचे जाणवते.

कृतज्ञता : ‘हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळे मला पू. गिंडेगुरुजी आणि केशववेणू यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये अनुभवण्यास मिळाली’, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१०.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.