‘८.६.२०२१ या दिवशी कु. ऐश्वर्या रायकर (आताच्या सौ. ऐश्वर्या शेट) यांनी संगीताशी संबंधित सेवा करणार्या साधकांसाठी असलेल्या सत्संगात भावजागृतीचा प्रयोग सांगितला. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले संगीताशी संबंधित सेवा करणार्या साधकांना भेटण्यासाठी येणार असून त्यांच्याशी बोलणार आहेत’, अशा आशयाचा भावजागृतीचा प्रयोग होता. त्या वेळी आणि नंतर मी घरी गेल्यावर अनुभवलेल्या भावस्थितीविषयी येथे दिले आहे.
१. साधिका भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना अनुभवलेली भावस्थिती
१ अ. तबलावादन आणि सतारवादन यांचा नाद ऐकू येणे अन् ‘सतारीच्या धूनवर साधिका नृत्य सादर करून प.पू. डॉक्टरांचे स्वागत करत आहेत’, असे दिसणे : साधिकेने भावजागृतीचा प्रयोग सांगण्यास आरंभ केल्यावर मला सूक्ष्मातून सतारवादनाचा मधुर नाद प्रयोग संपेपर्यंत ऐकू येत होता. साधिकेने सांगितले, ‘‘आपल्याला प.पू. डॉक्टरांच्या पावलांची चाहूल लागली आहे.’’ तेव्हा प.पू. डॉक्टर प्रत्येक पाऊल टाकत असतांना मला हलकासा तबल्याचा नाद ऐकू येत होता. साधिकेने ‘‘सूक्ष्मातून प.पू. डॉक्टर आपल्या दिशेने दाराजवळ येत आहेत’’, असे सांगितल्यावर ‘सतारीच्या धूनवर साधिका नृत्य सादर करून त्यांचे स्वागत करत आहेत’, असे मला दिसले.
१ आ. काही दिवसांपूर्वी अधूनमधून सूक्ष्मातून सतारवादन ऐकू येणे आणि भावजागृतीच्या प्रयोगातही त्याच स्वरूपाचे वादन सूक्ष्मातून ऐकू येणे अन् ‘प.पू. डॉक्टर हृदयात विराजमान झाले आहेत’, असे जाणवणे : त्यापूर्वी काही दिवस मला अधूनमधून सूक्ष्मातून सतारवादन ऐकू येत होते. या प्रयोगात मला सूक्ष्मातून त्याच स्वरूपाचे वादन ‘प.पू. डॉक्टर आपल्या दिशेने दाराजवळ येत आहेत’, असे सांगितल्यावर ऐकू आले. ‘ते दार म्हणजे माझे मन आणि हृदय यांचे दार आहे अन् प.पू. डॉक्टर माझ्या हृदयात विराजमान झाले आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती झाली.
१ इ. भावजागृतीच्या प्रयोगात ‘परात्पर गुरु डॉक्टर मार्गदर्शन करत आहेत’, असे सांगितल्यावर ते शब्द ऐकू न येणे, ‘साधिका नृत्य आणि गायन अन् साधक सतारवादन आणि तबलावादन करत असतांना वातावरण नादमय झाले’, अशी अनुभूती येणे : त्यानंतर ऐश्वर्याने सांगितले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत.’’ तेव्हा मला ते शब्द ऐकू आले नाहीत. ‘काही साधिका नृत्य करत असून काही साधिका सुमधुर गायन करत आहेत आणि श्री. मनोज सहस्त्रबुद्धे सतारवादन अन् श्री. गिरिजय प्रभुदेसाई हे तबलावादन करत आहेत. त्यामुळे ‘वातावरण नादमय झाले आहे’, अशी अनुभूती येत होती. काही वेळाने मला तो नाद ऐकू न येता ‘प्रत्येक साधकाच्या अंतरंगात गायन, वादन आणि नृत्य चालू झाले आहे अन् आंतरिक संगीताच्या परमानंदात सगळे मग्न झाले आहेत’, असे मला दिसत होते.
१ ई. भावजागृतीच्या प्रयोगामध्ये ‘नृत्य करत असलेली प्रत्येक साधिका स्वतःच आहे’, असे जाणवणे : भावजागृतीच्या प्रयोगामध्ये नृत्य करणार्या साधिका परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासमोर नृत्य करत असतांना मला मी दिसतच नव्हते. अन्य सर्व साधिका दिसत होत्या. ‘नृत्य करणारी प्रत्येक साधिका मीच आहे. मी वेगळी नाही’, असे मला जाणवत होते. प्रत्येक जण करत असलेल्या नृत्याची अनुभूती मला येत होती. यापूर्वी घरी काही दिवस मी भावजागृतीचा प्रयोग, नृत्याभ्यास किंवा नृत्यसेवा करत असतांनाही मला अशाच प्रकारची अनुभूती येत होती. तेव्हा माझ्या मनात ‘मी न दिसता अन्य साधिका का दिसत आहेत ?’, असा विचार आला; पण बुद्धीचा भाग असेल; म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले. ८.६.२०२१ या दिवशी साधिकेने सांिगतलेल्या भावजागृतीच्या प्रयोगातही तसेच घडल्यावर मला आश्चर्य वाटले.
१ उ. ‘स्वतःतील ‘मीपणा’ नष्ट करण्यासाठीच देवाने ही अनुभूती देऊन त्यातून घडवले’, असे लक्षात येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अनुभवणे : भावजागृतीचा प्रयोग संपल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करतांना सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे) यांनी ‘सर्व जण असेच अनुभवून एकत्रितपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहूया’, असे सांगितले. तेव्हा ‘मी आणि नृत्य करणारी साधिका वेगळी नाही. एकच आहे’, असे मला वाटले. देवच मला सर्वांच्या माध्यमातून शिकवत आहे. मला केवळ नृत्यातून अनुभूती घेणे, आनंद अनुभवणे, नृत्याचा अभ्यास करणे आणि शिकणे, एवढेच करायचे आहे. ‘माझ्यातील ‘मीपणा’ नष्ट करण्यासाठीच देवाने मला ही अनुभूती देऊन त्यातून घडवले’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर माझे मन शांत झाले. मला ही शांतता आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सतत २ घंटे अनुभवता आले.
१ ऊ. भावजागृतीच्या प्रयोगानंतर आनंद होणे, ‘सत्संगातील सर्व साधकांच्या भावस्थितीचा एकत्रित परिणाम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा’ यांमुळे सर्व साधकांनी भावस्थिती अनुभवणे : भावजागृतीच्या प्रयोगानंतर मला पुष्कळ आनंद होत होता. ‘अंतरंगातील संगीत असेच अनुभवत रहावे’, असे मला वाटत होते. या वेळी ‘भावजागृतीचा प्रयोग सांगणार्या साधिकेने अंतरंगातील संगीताविषयी सांगितले’, हे मला ठाऊक नव्हते. मला त्या संदर्भात भावजागृतीचा प्रयोग संपल्यानंतर समजले. ‘सत्संगातील सर्व साधकांच्या भावस्थितीचा एकत्रित परिणाम आणि मुख्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा’ यांमुळे आम्ही सर्वांनी ही भावस्थिती अनुभवली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. घरीही भावस्थिती अनुभवणे
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व अधिक प्रमाणात अनुभवणे आणि कुटुंबियांतील मतभेद नाहीसे होऊन प्रीतीचे बंध निर्माण होणे : नंतर २ घंट्यांनी मी घरी आल्यावर आम्ही (मी, माझी आई (सौ. सविता तिवारी), कु. कनक (भाची, बहिणीची मुलगी) परात्पर गुरु (डॉ). आठवले यांच्याविषयी बोलत होतो. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणजे सत्य असून ते परमेश्वर आहेत. ते आपल्या मनातील सर्व जाणतात’, असे आम्ही बोलत होतो. तेव्हा एक क्षण आईला आणि मला ‘परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून आले आहेत. त्यांचे तत्त्व कार्यरत होऊन खोलीतील वातावरण पालटले आहे’, असे प्रकर्षाने जाणवले. काही क्षण आम्ही तिघीही एकमेकींकडे पाहू लागलो आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर आमच्या समवेतच आहेत’, असे आम्हाला जाणवले. आम्ही संभाजीनगर येथून स्थानांतरित होऊन गोवा येथे येऊन ६ ते ७ मास झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुभवण्याची ही पहिलीच घटना घडली. आमच्या तिघींमधेही काही प्रमाणात वैचारिक मतभेद होते. ते जणू परम पूज्यांच्या अस्तित्वाने क्षणार्धात नाहीसे झाले आणि आमच्यात प्रीतीचे बंध निर्माण झाले.
२ आ. ‘परम पूज्य’ या शब्दांत आणि त्यांच्या स्मरणात किती सामर्थ्य आहे !’, याची प्रचीती येणे : तेव्हा ‘परम पूज्य’ या शब्दांत आणि त्यांच्या स्मरणात किती सामर्थ्य आहे !’, याची मला प्रचीती आली. या भावमय संवादाचा परिणाम, म्हणजे मी नंतर ७ घंटे त्याच भावस्थितीत होते. मला या कालावधीत उत्साह आणि चैतन्य जाणवत होते. मला ‘नामजप आणि सेवाच करत रहावी’, असे वाटत होते. माझ्या मनात ‘अपराधीभाव, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव’ अशा विविध भावांचे तरंग आलटून पालटून सहजतेने तरंगत होते. माझे मन एकदम शांत झाले. भावजागृतीचा प्रयोग झाल्यानंतर मला एकूण दहा घंटे प.पू. डॉक्टरांच्या अस्तित्वाची अनुभूती सतत येत होती.
‘परम पूज्य, तुम्ही मला घडवण्यासाठी प्रत्येक क्षणी कृपा करता. तुमची ही कृपा मला सदोदित अनुभवता येऊ दे. मला तुम्हाला अपेक्षित असे घडता येऊन सतत भावस्थितीत रहाता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |