राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ३१.१०.२०२१

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

सर्व प्रकारचे गुन्हे करणारे पोलीस नोकरीत ठेवणारे सरकारही गुन्हेगारच आहे !

‘गोव्यात महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात प्रेयसीसाठी स्वतःच्या पत्नीचा छळ करणार्‍या राज्यातील ५ पोलिसांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. पोलीस असलेल्या पतीकडून घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहिती गोवा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विद्या गावडे-सतरकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.’


मंदिरे भक्तांसाठी कि महनीय व्यक्तींसाठी आहेत ?

‘कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मंदिरे सर्वांसाठी बंद असल्याच्या कालावधीत मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात महनीय व्यक्तींना प्रवेश देण्यात येत होता. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, तसेच चित्रपट निर्माती आणि दिग्दर्शक एकता कपूर यांनी मंदिरात दर्शन घेतल्याचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावर  प्रसिद्ध झाले.’


इरादापत्र देतांना त्याची कारणमीमांसा न देणारे मंत्री राज्याचा कारभार कसा चालवत असतील ?

‘संभाजीनगर (महाराष्ट्र) जिल्ह्यातील ६ शैक्षणिक संस्थांना नव्या महाविद्यालयांसाठी राज्य सरकारने दिलेले इरादापत्र (महाविद्यालय चालू करण्याविषयीचा उद्देश व्यक्त करणारे पत्र) मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने ३१.८.२०२१ या दिवशी रहित केले आहे. यात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संस्थेच्याही ३ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठ कायद्यानुसार अपवादात्मक परिस्थितीत इरादापत्र देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे; मात्र त्याची कारणमीमांसा देणे आवश्यक असते. या प्रकरणात तसे नमूद करण्यात आलेले नाही, असे सांगून न्यायालयाने हा आदेश दिला.’


कुठल्याही क्षुल्लक कारणावरून हिंदूंची तक्रार नोंदवणारे धर्मांध आणि धर्मांधांच्या संदर्भात अतीसहिष्णु असणारे हिंदू !

‘माझे एक परिचित ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाला भेट देणारे आहेत. ते एका धर्मांधाच्या ४ तारांकित उपाहारगृहामध्ये नोकरी करतात. ते साधनाही करतात. या उपाहारगृहामध्ये येणार्‍या ग्राहकांचे त्यांनी नमस्काराच्या मुद्रेत स्वागत केले. एका धर्मांध ग्राहकाने हे पाहून त्या उपाहारगृहाच्या मालकाकडे या व्यक्तीबद्दल तक्रार केली आणि ते त्याच्या नोकरीवर बेतले.

याउलट इथेच एका हिंदूचे दुकान आहे. तिथे त्याने त्याच्या मुसलमान कर्मचार्‍याला नमाजपठण करण्यासाठी वेळ आणि वेगळी जागा उपलब्ध करून दिली आहे.

असे असूनही ‘हिंदूंना असहिष्णु आणि धर्मांधांना दबून राहिलेले म्हणतात’, हे किती हास्यास्पद आहे !’

– एक साधिका (५.३.२०२०)


भ्रष्टाचार नाही, असा भारतात एक तरी विषय आहे का ?

‘उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एप्रिल २०२१ मासामध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या आयोजनाच्या वेळी कोरोना चाचणीवरून झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि देहली येथील काही पॅथॉलॉजी प्रयोगशाळांवर धाडी टाकल्या.’


गॅस सिलिंडरसाठी ८९८ रुपये ५० पैसे अशी किंमत ठेवणे सरकारला हास्यास्पद !

‘घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. गोव्यात गॅस सिलिंडरसाठी ८९८ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत.’