समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून घेतले जाणारे वरवरचे निर्णय टाळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता !

पू. तनुजा ठाकूर

‘हरियाणामध्ये सरकारी कर्मचार्‍यांना आधुनिक घड्याळे (स्मार्टवॉच) दिली जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासमवेत त्यांची उपस्थितीही लक्षात घेता येईल’, अशी बातमी प्रकाशित झाली आहे. ‘सर्वांनी नियमांचे पालन करावे’, या हेतूने सध्याचे नेते शहरांमध्ये सर्वत्र ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ (परिसरावर लक्ष ठेवण्यासाठीचे विशिष्ट छायाचित्रक) लावले जावेत’, असे म्हणतात, तर कधी ‘पोलिसांच्या गणवेशावर बॉडीवॉर्न कॅमेरा (पोशाखावर लावता येईल, असा छोटा छायाचित्रक) लावावा’, असे म्हणतात. अशा प्रकारच्या उपाययोजना ऐकून ‘समस्यांवर उपाय शोधण्याच्या संदर्भात प्रशासनाचे विचार किती वरवरचे आहेत’, हेच लक्षात येते.

शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात नैतिकता, कर्तव्यनिष्ठा यांचा अभाव असण्याचे कारण म्हणजे त्यांना धर्मशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे ‘कर्तव्याचे पालन न करणे, अयोग्य आचरण करणे किंवा धर्मपालन न करणे यांमुळे पाप कर्मांची निर्मिती होऊन त्याचे फळ आपल्याला या जन्मात किंवा पुढील जन्मात भोगावे लागेल’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. जर सर्वांना धर्मशिक्षण दिले गेले, तर अशा आधुनिक उपकरणांवर कोट्यवधी रुपये व्यय करावे लागणार नाहीत. हिंदु राष्ट्रात अशा उपकरणांच्या माध्यमातून कुणावरही लक्ष ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही; कारण सर्व जण धर्मनिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ असतील.’

– पू. तनुजा ठाकूर (२४.१०.२०२१)