वेळागर, शिरोडा येथील प्रस्तावित ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला प्रारंभ होणार

 स्थानिकांचा आक्षेप असलेला ‘सर्वे क्रमांक ३९’ वगळला  

वेंगुर्ले – महाराष्ट्र राज्य सरकारने करार केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर येथील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला आता प्रारंभ होणार आहे. शिवसेनेचे खासदर विनायक राऊत यांनी या भागाला भेट देऊन पहाणी केली. या वेळी त्यांनी स्थानिकांचा आक्षेप असलेला ‘सर्वे क्रमांक ३९’ हा भूमीचा भाग या प्रकल्पाच्या भूमीतून वगळल्याचे सांगितले, तसेच ज्यांनी भूमी दिल्या आहेत, त्यांना वाढीव दराने मोबदला मिळणार, असे घोषित केल्याने भूमीपूत्रांना दिलासा मिळाला आहे.

शिरोडा येथील श्री लिंगेश्‍वर मंदिरात झालेल्या बैठकीत खासदार राऊत यांनी सांगितले की, वेळागर येथील ‘ताज पर्यटन प्रकल्पा’साठी २५ ते ३० वर्षांपूर्वी कवडीमोलाने स्थानिकांकडून भूमी घेतल्या होत्या. त्या भूमीधारकांना वाढीव दर मिळावा, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एम्.टी.डी.सी.च्या) माध्यमातून महाराष्ट्र सरकार निश्‍चित प्रयत्न करेल.

शिरोडा, वेळागर येथील ‘सर्वे क्रमांक ३९’ मधील स्थानिक भूमीपूत्र गेली ३० वर्षे न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र विद्यमान आघाडी शासनाने ‘ताज ग्रुप’शी बोलणी करून त्यांच्या प्रकल्पातील गावठाण भाग वगळून इतर भूमी ‘ताज ग्रुप’ ला दिली. खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामस्थांनी खासदार राऊत यांचे येथे भव्य स्वागत केले.

या वेळी ‘सर्वे क्रमांक ३९’ संघर्ष समितीचे जयप्रकाश चमणकर, नीलेश चमणकर, शिवसेना विभाग प्रमुख काशीनाथ नार्वेकर यांच्यासाहित स्थानिक भूमीपूत्र उपस्थित होते.