पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकांची आवश्यकता असू शकत नाही ! – ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर 

साहित्य क्षेत्राची विदारक स्थिती पालटण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !

ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर 

पुणे – शासनकर्त्यांनी साहित्यात रस घेतला नाही. पक्षीय राजकारणाने साहित्य व्यवहार ढवळून निघाला आहे. पुरस्कारवापसीतून लेखकांनी आपले स्वातंत्र्य सरकारकडे गहाण का टाकावे ? पुरस्कार ही ताठ कण्याच्या लेखकाची आवश्यकता असू शकत नाही, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला आठलेकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, ‘‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार हा खर्‍या अर्थाने लेखकाचा सन्मान करतो. याउलट राज्य सरकारचे पुरस्कार सहज मिळत नाहीत, तर ते मिळवावे लागतात. त्यासाठी लेखकाला अर्ज करावा लागतो; कारण पुरस्कार हे साहित्यिकांची आवश्यकता झाली आहे.’’

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे नेहमीच वादाचे सूत्र असते; मात्र ‘वयोवृद्ध साहित्यिकांनी त्यांना मिळणारे अध्यक्षपद नाकारून तरुण लेखकांना दिले पाहिजे’, असे त्या म्हणाल्या.