सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या (‘डिटेक्टिव्ह ब्रँच’च्या) असमाधानकारक कामगिरीमुळे ती शाखाच विसर्जन करण्याची नामुष्की ओढावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपयशी ठरल्यामुळेच वरिष्ठांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
गोपनीय शाखेला पोलीसदलात विशेष महत्त्व आहे. सामान्य नागरिकांमध्ये मिसळून पोलीसदलाची प्रतिमा उंचावणे, गोपनीय माहिती मिळवणे, पोलीस ठाण्याच्या सीमेमध्ये प्रत्येक गुन्हेगाराच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आदी मुख्य कार्य या शाखेकडून केली जातात, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा कुणाशी संपर्क आहे ?; त्यांचे मित्र, नातेवाईक, कुटुंबीय यांविषयीची माहिती, छायाचित्र यांसह कागदपत्रे सिद्ध करणे आदी कामे अपेक्षित असतात; मात्र अशी कोणतीही कामगिरी या शाखेकडून झाली नसल्याचे लक्षात आले. पोलीस प्रशासनाने जरी सध्याची शाखा विसर्जित केली असली, तरी त्यामध्ये फेररचना करून नवीन शाखा निर्माण करण्याच्या हालचाली चालू केल्या आहेत. ‘शहरासोबत जिल्ह्यातील सर्वच गोपनीय शाखेचा आढावा घेऊन त्यांची फेररचना करण्याची आवश्यकता आहे’, असे मत अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी व्यक्त केले आहे.
गुन्हे उघडकीस आणणे आणि गुन्ह्यांना प्रतिबंध घालणे, हेच या शाखेचे मुख्य कार्य असते. त्यामुळे गुन्हे शाखा, गोपनीय शाखा किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या ठिकाणी वर्णी लागावी, असा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यातही वाहतूक शाखेसह अन्य शाखांतून आलेल्या कर्मचार्यांकडे गुन्हेगारांविषयी माहिती असेलच, असे नाही. त्यामुळे अनेकदा गुन्हे शाखेत किंवा गोपनीय शाखेत काम केलेल्या कर्मचार्यांनाच पुन: पुन्हा संधी मिळते. त्यामुळे कुठेही स्थानांतर (बदली) झाल्यास तीच शाखा मिळेल, असे सर्वजण गृहीत धरतात. यातून कर्मचार्यांमध्ये ‘आमच्याविना पर्याय नाही’ अशी भावना वाढीस लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील गोपनीय आणि गुन्हे शाखेकडून अधिक चांगली कामगिरी होण्यासाठी आवश्यक फेररचना कशी करता येईल ? यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शहरासह जिल्ह्यातील गोपनीय शाखांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून त्यामध्ये योग्य कर्मचार्यांना कामाची संधी दिल्यास गुन्ह्यांची उकल करण्यास साहाय्य होईल !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा