युवक कौशल्यपूर्ण झाल्यास गोवा स्वयंपूर्ण होईल !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आसगाव, म्हापसा येथे भरती मेळाव्याचे उद्घाटन !

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

म्हापसा, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्याचा शैक्षणिकदृष्ट्या विकास करतांना युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध  आहेे. त्यासाठी सरकार खासगी आस्थापनांच्या सहकार्याने कौशल्यपूर्ण युवावर्ग सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कौशल्ये आत्मसात करून युवावर्ग स्वतःच्या पायावर उभा राहिल्यास स्वयंपूर्ण गोवा हे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. २७ ऑक्टोबरला सरकारच्या स्वयंपूर्ण युवा मोहिमेच्या अंतर्गत आसगाव येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात भरती मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘दहावीपासून ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रत्येक युवकाची सरकारला काळजी आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्वयंपूर्ण कार्यक्रमातून गोव्यातील युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात अधिक प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.’’ या वेळी अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात २५ विविध खाती आणि ६० विविध आस्थापने सहभागी झाली आहेत. या आस्थापनांकडून १ सहस्र ३०० हून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.