स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘भारतीय इतिहास संशोधन परिषदे’च्या वतीने २ दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन !

स्वातंत्र्यवीर सावरकर

रत्नागिरी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारत राष्ट्र, तसेच भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांचे निर्मूलन यांच्यासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून त्यांच्या विचारांनुसार जातीव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात भारतीय इतिहास संशोधन परिषद (आय.सी.एच्.आर्.) आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील Dismantling of Casteism : Lessons from Savarkar’s Essentials of Hindutva (जातीयवादाचे उच्चाटन : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्वासाठी आवश्यक गोष्टींतील धडे) या विषयावरील दोन दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. या परिषदेचा प्रारंभ राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाला.

या वेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले,

१. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली असली, तरी आजही भारतात काही गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता जेव्हा नष्ट होईल, तेव्हाच खर्‍या अर्थाने समाज आणि राष्ट्र सुस्थिर होईल.

२. भारतीय जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत केलेली कार्ये अत्यंत महत्त्वाची अन् गौरवपूर्ण आहेत.

३. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. आज देशाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता असून नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची आवश्यकता आहे.