सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठारावर जैविक कचरा जाळण्याचा प्रकार !

सातारा, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – जागतिक वारसा स्थळ असणार्‍या सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठाराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये २० ऑक्टोबर या दिवशी जैविक कचरा आणून जाळण्यात आला. याविषयी ग्रामस्थ किंवा अन्य कुणालाही काहीही कल्पना नव्हती. घटनास्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत जैविक कचरा आढळून आल्यावर याविषयी चर्चा चालू झाली. याविषयी ग्रामपंचायतीने दक्षता घेत परिसर स्वच्छ केला; मात्र अज्ञातांचा तपास अद्याप लागलेला नाही.

२० ऑक्टोबर या दिवशी अज्ञातांनी गाडीभर जैविक कचरा आणून कासजवळील पारंबे गावाच्या सीमेत जाळला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले होते, तसेच परिसरामध्ये पुष्कळ दुर्गंधी पसरली होती. येणार्‍या-जाणार्‍यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. शासकीय नियमाप्रमाणे अशा वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक असते.