सुदानमध्ये सैन्याकडून अनधिकृत सत्ता परिवर्तन !

सैन्याकडून बंड पुकारल्यानंतर पंतप्रधान हामडोक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना बंदी बनवले ! – संपादक

खार्टुम (सुदान) – सुदानचे पंतप्रधान अबदुल्लाह हामडोक यांना २५ ऑक्टोबर या दिवशी सैन्याधिकार्‍यांनी बंदी बनवल्याचे वृत्त आहे. पंतप्रधानांच्या समवेत अन्यही राजकीय नेत्यांना बंदी बनवून अज्ञात स्थळी नेल्याचे म्हटले जात आहे. यासमवेत सैन्याकडून अनधिकृतरित्या सुदानचे सत्ता परिवर्तन केल्याची माहितीही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे. सैन्याधिकार्‍यांनी हे बंड का पुकारले आहे ? या मागील कारण काय आहे ? याविषयी माहिती समोर आलेली नाही. या बातमीला कोणत्याही सरकारी किंवा इतर संस्था यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.

‘रॉयटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला मिळालेल्या माहितीनुसार सैन्यातील काही अधिकार्‍यांनी पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांच्या घरी बलपूर्वक प्रवेश करत पंतप्रधानांना नियंत्रणात घेतले आहे. सैन्याने केलेल्या या कथित राजकीय उलथापालथीस समर्थन देण्यासाठी पंतप्रधान हामडोक यांच्यावर दबाव बनवला जात आहे, अशी माहितीही या वृत्तसंस्थेने प्रसारित केली आहे.