तोंडोळी (जिल्हा संभाजीनगर) वस्तीवर दरोडा टाकून महिलांवर अत्याचार केल्याचे प्रकरण
संभाजीनगर – पैठण तालुक्यातील तोंडोळी येथील वस्तीवरील घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. राज्यात महिला आणि मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सरकारने अत्याचारग्रस्त कुटुंबियांना तातडीचे साहाय्य केले पाहिजे. शिवशाहीचे वचन देणार्यांनी निजामशाही आणली आहे. राज्यात मोगलाई आली आहे. महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री पसार होत असतील, तर प्रकरणातील आरोपी कसे सापडतील ?, अशी टीका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
३ दिवसांपूर्वी पैठण तालुक्यातील बिडकीन गावाजवळील तोंडोंळी वस्तीवर दरोडेखोरांनी दरोडा टाकून वस्तीतील २ महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. त्या अनुषंगाने भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी वस्तीला २१ ऑक्टोबर या दिवशी भेट देऊन सरकारवर टीका केली.
नीलम गोर्हे लवकरच पीडित कुटुंबियांची भेट घेणार !
‘पैठण येथील पीडित कुटुंबियांना समुपदेशनाची आवश्यकता आहे. त्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मी जाणार असून आरोपींना तातडीने अटक करण्याची आवश्यकता आहे’, असे शिवसेनेच्या नेत्या नीलम गोर्हे यांनी म्हटले आहे. या घटनेसमवेतच नगर जिल्ह्यात पारनेरमध्येही एका अल्पवयीन मुलीची हत्या झाली आहे. या प्रकरणात तातडीने अन्वेषण करण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.