शेतकरी अद्यापही विनामूल्य डिजिटल सात-बार्‍याच्या प्रतीक्षेत !

कागदावरील योजना प्रत्यक्षात आल्या, तरच नागरिकांना त्यांचा लाभ होईल. अन्यथा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय होईल. त्यामुळे योजना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! – संपादक 

किरकीटवाडी (पुणे) – भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ या उपक्रमांतर्गत शासनाच्या महसूल आणि वनविभाग यांच्या आदेशानुसार २ ते ९ ऑक्टोबरपर्यंत विनामूल्य डिजिटल सात-बारा उपलब्ध होणार आहे, अशी माहिती हवेली तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी दिली होती; मात्र गोर्‍हे बुद्रुक आणि आगळंबे येथील मोजके शेतकरी वगळता गावातील इतर शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

शेतकरी आणि इतर नागरिक यांना सोयीचे होण्यासाठी प्रत्येक गावात विनामूल्य सात-बाराचे वितरण व्हायला हवे, असे मत कुडजे गावाचे माजी सरपंच समीर पायगुडे यांनी व्यक्त केले. सर्व सात-बारा उतारे प्रिंट काढून (छापून) सिद्ध आहेत; मात्र तलाठ्यांच्या संपामुळे त्यांचे वितरण करणे शक्य नाही. संप संपल्यानंतर प्रत्येक गावात विनामूल्य डिजिटल सात-बारा उतार्‍याचे वाटप केले जाईल, अशी माहिती हवेली तहसीलदारांनी दिली.