‘पू. देयान ग्लेश्चिच ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या (स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनच्या) जगभरातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. पू. दादांमध्ये असलेल्या अनेक गुणांमुळे आम्हाला प्रतिदिनच त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. त्यांचे गुणवर्णन करण्यासाठी माझ्याकडे योग्य शब्द नाहीत, तरीही मी त्यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
१. जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती
पू. दादांना एखादी नवीन गोष्ट किंवा नवीन संकल्पना समजली, तर ते त्याविषयी जाणून घ्यायला उत्सुक असतात. ते अतिशय बारकाईने त्याविषयीची माहिती गोळा करून ती समजून घेतात. नंतरच ते ‘ती गोष्ट आमच्या सेवेसाठी कशी साहाय्यभूत ठरेल ?’, याविषयी आम्हाला सांगतात. त्यामुळे आम्हाला ‘ती संकल्पना समजून घेणे आणि त्यानुसार सेवा करणे’ अतिशय सोपे जाते.
२. अनासक्त
साधारण मागील २ वर्षांपासून पू. देयानदादा रामनाथी (गोवा) येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात वास्तव्याला आहेत. ते येथे येण्याच्या अनुमाने ६ मासांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता, तरीही पू. दादा त्यांचे घर किंवा कुटुंबीय यांच्याविषयी क्वचितच बोलतात. ‘पू. दादा मायेतील सर्व नात्यांपासून अलिप्त झाले असून आता त्यांचे नाते केवळ भगवंताशी आहे’, असे मला जाणवते. त्यांना खाणे-पिणे किंवा कपडे यांविषयी कुठलीही आसक्ती नाही किंवा कसलीही आवड-नावड नाही. त्यांना दिलेली प्रत्येक गोष्ट ते कृतज्ञताभावाने स्वीकारतात. ते आश्रमजीवनाशी पूर्णपणे एकरूप झाले आहेत.
३. समष्टी सेवेची तीव्र तळमळ
अ. दिवस असो वा रात्र, पू. दादा सतत सेवारत असतात. विदेशातील अध्यात्मप्रसाराच्या अंतर्गत त्यांच्याकडे पुष्कळ सेवा असतात. पू. दादा त्या सर्वच सेवा तेवढ्याच उत्साहाने करतात.
आ. ‘साधकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी कशा प्रकारे साहाय्य करू शकतो ?’ किंवा ‘संकेतस्थळाच्या माध्यमातून देश-विदेशात अध्यात्माचा प्रसार कसा करू शकतो ?’, यांविषयीच्या समष्टी विचारांमध्ये ते सतत मग्न असतात.
इ. काही दिवसांपूर्वी पू. दादा रुग्णाईत असल्यामुळे त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्या वेळी ते त्यांच्या भ्रमणभाषवरून सेवा करत होते. रुग्णाईत असतांनाही त्यांनी त्यांच्या सेवेत खंड पडू दिला नाही.
४. एखाद्या साधकाला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास ते त्याला सदैव तत्परतेने साहाय्य करतात.
५. भाव
५ अ. देवतांप्रतीचा भाव : पू. दादा आध्यात्मिक संशोधन केंद्रातील ध्यानमंदिरात येतात. तेव्हा प्रत्येक वेळी त्यांचे हात अत्यंत भक्तीभावाने जोडलेले असतात. पू. दादा ध्यानमंदिरात आल्यावर सर्व देवतांना साष्टांग नमस्कार करतात आणि नंतरच नामजप करण्यासाठी बसतात.
५ आ. संतांप्रतीचा भाव : एका सत्संगाच्या वेळी पू. दादांना एका संतांच्या शेजारी ठेवलेल्या आसंदीत बसायला सांगितले गेले. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर ‘त्या संतांच्या शेजारी बसण्याची माझी पात्रता नाही. मी त्यांच्याजवळ कसा बसू ?’, असा भाव होता.
५ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव : पू. दादा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रासमोर उभे राहून त्यांना प्रार्थना करत असतांना त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती असलेला भाव त्यांच्या तोंडवळ्यावरून दिसून येतो. तेव्हा ‘एखादा शिष्य किंवा भक्त देवतेकडे पहात आहे’, असे आम्हाला जाणवते. त्या वेळी पू. दादा एखाद्या लहान बालकाप्रमाणे वाटतात. त्यांचा तो भाव पाहूनच आमचा भाव जागृत होतो.
६. अनुभूती
पू. दादा मार्गदर्शन करत असतांना ‘त्यांच्या बोलण्यातून ज्ञानशक्ती प्रवाहित होत आहे’, असे जाणवणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्हाला व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या अनुषंगाने पू. दादांचा मार्गदर्शनपर सत्संग मिळतो. एकदा पू. दादा व्यष्टी साधनेविषयीचा सत्संग घेत होते. मला सत्संग घेण्याच्या दृष्टीने शिकण्यासाठी त्या सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा पू. दादा मार्गदर्शन करत असतांना ‘त्यांच्या बोलण्यातून ज्ञानशक्ती प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवले. ती ज्ञानशक्ती मला अंतःकरणाच्या स्तरावर अनुभवता आली. त्यामुळे पू. दादा करत असलेले मार्गदर्शन थेट माझ्या अंतःकरणापर्यंत गेले.
७. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे श्रीकृष्णा, हे गुरुदेव, ‘पू. देयानदादा यांच्यातील गुणांचा आम्हाला अधिकाधिक लाभ करून घेता येऊ दे. आम्हाला त्यांच्याकडून शिकता येऊ दे. त्यांचे गुण आम्हाला आत्मसात करता येऊ देत. त्यासाठी आपणच आम्हाला साहाय्य करावे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. रिशिता गडोया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.५.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |