सौ. रुक्ष्मणी किरीट कापडिया (वय ७५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

भावपूर्ण नामजप करणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती अपार भाव असणार्‍या गिरगाव (मुंबई) येथील सौ. रुक्ष्मणी किरीट कापडिया (वय ७५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

(‘रुक्मिणी’ला गुजराती भाषेत ‘रुक्ष्मणी’ असे म्हणतात.)

‘गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील माझी मोठी बहीण सौ. रुक्ष्मणी किरीट कापडिया (वय ७५ वर्षे) हिच्याशी माझे अधूनमधून साधनेविषयी बोलणे व्हायचे. ती अनेक वेळा मला जिज्ञासेने काही प्रश्न विचारायची. तिने कधीही कुठलाही सत्संग ऐकला नाही किंवा कुठल्याही गुरूंकडून अनुग्रह घेतलेला नाही, तरीही तिला असलेले आध्यात्मिक ज्ञान ऐकून मला फार आश्चर्य वाटते. मला तिची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. रुक्ष्मणी कापडिया

१. जिज्ञासा

रुक्ष्मणीताईला प्रचंड जिज्ञासा असून ती प्रत्येक विषयाविषयी प्रश्न विचारून सखोल माहिती मिळवते. तिला एखादा विषय लक्षात आला नाही, तर त्याचे उत्तर मिळेपर्यंत ती पाठपुरावा घेते.

२. सात्त्विक वृत्ती

रुक्ष्मणीताई अतिशय सात्त्विक आहे. मला तिचे बोलणे आणि वागणे चांगले वाटते.

३. भावपूर्ण नामजप करणे

मी रुक्ष्मणीताईला सांगितलेले नामजप ती सातत्याने आणि भावपूर्ण करते. ती मला सणांच्या वेळी ‘कोणता नामजप करायचा ?’, याविषयी विचारून घेते. ‘कोरोना महामारीच्या काळात प्रतिकारक्षमता वाढावी आणि आध्यात्मिक बळ मिळावे’, यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप ती नियमितपणे करते. ती सकाळी उठून आधी ३ माळा नामजप करते आणि नंतरच अन्य कामे करते, तसेच ती रात्री नामजप करूनच झोपते. तिला सांगितल्याप्रमाणे ती प्रत्येक नामजप संबंधित देवतेच्या चरणांकडे बघूनच करते. ती नामजप करतांना त्या देवतेच्या रूपाशी संपूर्णपणे एकरूप होते. तिने पितृपक्षात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजपही केला.

४. साधनेचे गांभीर्य असणे

ती मला ‘साधकांनी साधना करण्याच्या संदर्भात काही सूचना आली आहे का ?’, याविषयी विचारते.

सौ. देवी कपाडिया

५. मुलीच्या रुग्णाइत स्थितीत देवाचा धावा करून तिची सेवा करणे आणि तिच्या निधनानंतर नातेवाइकांच्या साहाय्याने क्रियाकर्म करवून घेणे

५ अ. मुलीच्या रुग्णाइत स्थितीत श्रीकृष्ण आणि यमुनामाता यांचा सातत्याने धावा करून मुलीची सेवा करणे : मागच्या वर्षी रुक्ष्मणीताईची मोठी मुलगी बरेच दिवस रुग्णाईत असल्याने ती अंथरुणाला खिळून होती. रुक्ष्मणीताईला दम्याचा (अस्थमाचा) त्रास आहे. कोरोना महामारीच्या दळणवळण बंदीच्या कालावधीत बहिणीला मुलीची सेवा करतांना कठीण जात होते, तरीही तिने श्रीकृष्ण आणि यमुनामाता यांचा सातत्याने धावा करून मुलीची सेवा केली.

५ आ. पुरोहितांकडून श्राद्धविधी करवून घेणे ः मुलीच्या निधनानंतर रुक्ष्मणीताईने एकटीने धावपळ करून मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवले. मुलीच्या यजमानांचा श्राद्धविधीवर विश्वास नसल्याने ताईने स्थिर राहून नातेवाइकांचे साहाय्य घेऊन अस्थी गोळा केल्या आणि क्रियाकर्म करवून घेतले. तिने पुरोहितांकडून श्राद्धविधीही करवून घेतले.

५ इ. मुलीच्या निधनानंतर ‘कोणता नामजप करायचा ?’, याविषयी विचारणे : तिने मुलीच्या निधनानंतर ‘मी कोणता नामजप करायचा ?’, याविषयी मला विचारले. तिने वर्षभर प्रतिदिन ८ ते १० घंटे भावपूर्ण नामजप केला. ‘मृत व्यक्तीचे छायाचित्र घरात लावू नये’, याविषयी मी तिला सांगितल्यावर तिने तिच्या मृत मुलीचे छायाचित्र कपाटात ठेवले.

६. रुक्ष्मणीताईचा श्रीकृष्णाप्रती भाव

६ अ. दिवसभर श्रीकृष्णाच्या अनुसंधानात रहाणे : रुक्ष्मणीताई दिवसभर श्रीकृष्णाशी बोलते. ती यमुनामातेला ‘आई’ अशी सातत्याने हाका मारते. काहीही चांगले घडल्यास ती सांगते, ‘‘श्रीकृष्णाने माझ्यासाठी हे केले.’’ कठीण प्रसंग पार पडल्यानंतर ती सांगते, ‘‘माझा श्रीकृष्ण माझ्यासाठी धावून आला.’’

६ आ. ती प्रतिदिन श्रीकृष्णाच्या बालरूपाशी भावपूर्ण बोलते आणि त्याची पूजा करते. पूजा करतांना ती श्रीकृष्णाशी एकरूप होते. त्या वेळी तिला कसलेही भान नसते.

६ इ. सत्संग किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन मिळाले नसतांनाही भावपूर्ण प्रार्थना करणे : ताईला कुठलाही सत्संग किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालेले नाही. तिला ‘श्रीकृष्ण आतूनच मार्गदर्शन करतो’, असे वाटते. तिला ‘प्रार्थना करणे आणि श्रीकृष्णाशी बोलणे’ याविषयी कुणीही शिकवले नाही, तरीही ती भावपूर्ण प्रार्थना करते. तिचे हे प्रयत्न पाहून मला श्रीकृष्णाप्रती कृतज्ञता वाटते. ‘देव सर्वांनाच मार्गदर्शन करतो’, असे मला वाटते.

६ ई. ती रुग्णाईत असतांना तिला माळेने नामजप करता येत नाही. तेव्हा तिला दुःख होते. ती मला म्हणते, ‘‘मला माळ धरता येत नाही, तरीही मी श्रीकृष्णाचा हात धरून ठेवला आहे.’’

६ उ. सध्या रुक्ष्मणीताईचा दम्याचा त्रास वाढल्याने तिला रुग्णालयात भरती केले आहे. कोरोना महामारीमुळे तिला एकटीलाच रुग्णालयात रहावे लागत आहे. तेथेही ती श्रीकृष्णाचा धावा करते.

६ ऊ. रुग्णाईत असतांनाही मनात केवळ नामजपाचे विचार असणे : काही दिवसांपासून रुक्ष्मणीताई रुग्णाईत आहे. तिला दमा आणि क्षयरोग (टी.बी.) आहे. मी तिला भ्रमणभाष केल्यावर ती केवळ ‘आज माझा नामजप अल्प झाला. आज मला त्रास होत असल्याने माझा नामजप होत नाही किंवा आज माझा नामजप संथ गतीने होत आहे’, असे नामजपाविषयीच बोलते. तेव्हा मला वाटले, ‘एखादी व्यक्ती रुग्णालयात असतांना केवळ ‘स्वतःचे आजारपण आणि त्रास’ यांविषयी बोलते; पण ताईला देवाची ओढ असल्याने तिच्या मनात केवळ नामजपाचेच विचार आहेत.’

७. रुक्ष्मणीताईला आलेली अनुभूती

८.१०.२०२१ या दिवशी तिला स्वप्नात दिसले, ‘श्रीकृष्णाने तिला प्रसाद आणि तुपाचा मोठा दिवा दिला.’

– सौ. देवी प्रताप कापडिया (लहान बहीण (वय ६८ वर्षे) आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१०.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक