१२.८.२०२१ या दिवशी ‘टाटा’ समुहाच्या ‘तनिष्क’ या अलंकारांविषयीच्या आस्थापनातील अधिकार्यांना ‘वैज्ञानिक उपकरणाद्वारे सात्त्विक अलंकार ओळखता यावेत’, यासाठी त्यांना ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे ‘अलंकारांच्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेच्या मोजणीच्या नोंदी कशा करायच्या ?’, याचे एक प्रात्यक्षिक ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे दाखवण्यात आले. त्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. १७ ऑक्टोबर २०२१ या दिवशीच्या लेखात आपण कार्यक्रमाची पूर्वसिद्धता करतांना आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. नंदिनी सामंत यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पाहिली.
श्री. आशिष सावंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
१. अनुभवलेली गुरुकृपा !
१ अ. ‘तनिष्क’च्या एका अधिकार्याने नोंदी (‘रिडिंग’) घेण्याचा क्रम पालटायला सांगणे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नोंदी (‘रिडिंग’) घेतल्यावर गुरुकृपेने प्रत्येक वेळी योग्य नोंदी (‘रिडिंग’) येणे : ‘आम्ही नेहमी आधी नकारात्मक ऊर्जेच्या २ नोंदी (इन्फ्रारेड (IR) आणि अल्ट्राव्हायोलेट (UV)) घेतो अन् त्यानंतर सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी घेतो; परंतु एका अलंकाराच्या नोंदी घेत असतांना ‘तनिष्क’च्या अधिकार्यांनी मध्येच नोंदी (रिडिंग) घेण्याचा क्रम पालटायला सांगितला. त्यांनी सांगितल्यानुसार त्याचे प्रात्यक्षिक करवून दाखवतांना देवाच्या कृपेने काहीच अडचण आली नाही. प्रत्येक वेळी योग्य त्या नोंदी (रिडिंग) आल्या. मी गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सातत्याने प्रार्थना करत होतो. त्यांनीच मला प्रत्येक वेळी साहाय्य केले आणि सर्व सेवा योग्य प्रकारे करवून घेतली.
२. जाणवलेली सूत्रे
२ अ. ‘सर्व सेवा करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असा भाव वाढणे : या कार्यक्रमासाठी अलंकारांच्या ‘यू.ए.एस्.’ने (‘युनिव्हर्सल ॲरो स्कॅनर’ने) प्रत्यक्ष नोंदी घेतांना माझ्या मनात ‘त्या योग्य येतील का ?’, असा विचार आला. तेव्हा ईश्वराने सुचवले, ‘सर्व सेवा करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत.’ त्यामुळे मी अन्य विचार न करता एका मागोमाग एक नोंदी घेत गेलो आणि त्या अपेक्षित अशाच आल्या.
२ आ. देवाच्या अनुसंधानात राहून सेवा केल्यावर ‘देवच सेवा पूरिपूर्ण करण्यासाठी शक्ती देतो’, असे अनुभवणे : कार्यक्रम चालू झाल्यापासून मी प्रार्थना करत होतो. त्यामुळे मला सातत्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाता येत होते. मी सलग २ घंटे उभा राहून नोंदी (रिडिंग) घेत होतो, तरी मला कुठल्याही प्रकारचा शारीरिक त्रास झाला नाही. ‘सेवा करतांना ईश्वराशी अनुसंधान असेल, तर देहभान विसरून सेवा करणे शक्य होते आणि हे सर्व करण्यासाठी देवच शक्ती देतो’, हे या सेवेच्या निमित्ताने मला अनुभवता आले.
२ इ. साधकांनी संघभावनेने आणि मनापासून सेवा केल्याने कार्यक्रम चांगला होणे अन् सर्वांनाच त्यातून आनंद मिळणे : या कार्यक्रमाच्या सेवेत ऐन वेळी अनेक पालट झाले, तरी चित्रीकरण करणार्या साधकांनी ते सर्व पालट आनंदाने स्वीकारून उत्साहाने सेवा केली. डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी अतिशय सुरेख पद्धतीने विषय मांडून ‘तनिष्क’च्या अधिकार्यांच्या सर्व शंकांचे निरसन फार चांगल्या प्रकारे केले. सर्वच साधकांनी त्यांच्या सेवा मनापासून केल्यामुळे या कार्यक्रमातून आम्हा सर्वांनाच पुष्कळ आनंद मिळाला.
३. तनिष्कच्या सदस्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी जिज्ञासेने अनेक प्रश्न विचारले आणि गुरुकृपेने आम्हाला त्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली.
४. अनुभूती
मला ध्वनीचित्रीकरण कक्षात (‘स्टुडिओ’मध्ये) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवत होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ईश्वर यांच्या कृपेमुळे मला या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला अन् पुष्कळ शिकायलाही मिळाले. त्यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (१५.८.२०२१)
सौ. मधुरा कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
साधकांनी संघभावनेने आणि शरणागतभावाने सेवा केल्याने ‘ही सेवा अप्रतिम झाली’, असे जाणवणे
‘कार्यक्रम चालू झाल्यानंतर काही वेळ तेथील वातावरणात मी एक दिव्यता अनुभवली. ‘सर्व साधक देवाच्या अनुसंधानात राहून शरणागत होऊन सेवा करत होते’, असे मला जाणवले. सर्व साधकांची मने जुळली होती. त्यामुळे ‘ही सेवा अप्रतिम झाली’, असे मला जाणवले. प्रत्येक साधकाच्या बोलण्यातून सकारात्मकता लक्षात आली. ते म्हणाले, ‘कार्यक्रमात येणार्या अडचणी ही नवीन शिकण्याची संधी आहे.’ संशोधन विभागातील साधकांनी संघभावनेने सेवा केली आणि ती देवाला अपेक्षित अशी होण्यासाठी पुष्कळ परिश्रमही घेतले. त्यासाठी मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’ (१६.८.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |