मंदिराच्या न्यासामध्ये सरकारी अधिकार्यांची नव्हे, तर भक्तांचीच निवड करणे आवश्यक आहे, हे या घटनेतून स्पष्ट होते ! – संपादक
नगर – शिर्डीतील ‘साईबाबा संस्थान’च्या जनसंपर्क विभागातील एका अधिकार्याने काही महिला भक्तांना भ्रमणभाषद्वारे अश्लील संदेश पाठवल्याची तक्रार आली आहे. आसाम आणि मुंबई येथील महिलांनी संस्थानकडे ही तक्रार केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकार्यांनी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे.
अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे शिवसेनेच्या महिला पदाधिकार्यांकडून एक निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहे. त्या ठिकाणी असे प्रकार होता कामा नयेत. आपण एक कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अशा महिला अधिकारी आहात. त्यामुळे आपल्याकडून महिला भक्तांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या गंभीर प्रकरणात आपण लक्ष घालून संबंधितांची चौकशी करून योग्य ती कडक कारवाई करावी.