चीनमध्ये कोरोनाचे केवळ १३ रुग्ण आढळताच शाळा बंद, तर विमानांच्या फेर्‍या रहित !

कोरोनाचे अत्यल्प रुग्ण आढळूनही तात्काळ कठोर उपाययोजना राबवणार्‍या चीनकडून भारत कधी शिकणार ? – संपादक

बीजिंग (चीन) – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. पर्यटकांच्या माध्यमांतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. विमानांच्या फेर्‍याही रहित केल्या आहेत. चीनमध्ये सध्या देशांतर्गत संसर्ग नाही; पण देशात सलग पाचव्या दिवशी १३ नवे रुग्ण आढळले आहेत.

चीनच्या उत्तर आणि वायव्य भागांत पर्यटनासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या एका गटाकडून हा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. हा गट आधी शांघायमध्ये आला. तेथून तो गांसू प्रांतातील शीआन आणि इनर मंगोलियामध्ये गेला. या नागरिकांच्या संपर्कात आलेले अनेक जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळले आहे. यांत काही जण राजधानी बीजिंगमधीलही आहेत. या पार्श्‍वभूमीवर चीनने चाचण्यांची संख्या वाढवली आहे. गर्दीची ठिकाणे, पर्यटनस्थळे, शाळा, मनोरंजनाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. संसर्ग अधिक असलेल्या ठिकाणी दळणवळण बंदीही लागू करण्यात आली आहे. घराबाहेर पडायचे असल्यास कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.