महापुरुषांच्या चरित्रामुळे लढण्याची प्रेरणा मिळते ! – अनंत करमुसे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

  • ‘क्रांतीवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार अनंत करमुसे यांना प्रदान !

  • मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मारहाण झाल्यावर श्री. करमुसे यांनी न्यायालयीन मार्गाने लढा दिल्याने आव्हाड यांच्यावर कारवाई झाली !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे १ श्री. अनंत करमुसे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तो क्षण

पंढरपूर – मी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा अनुयायी आहे. त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची चरित्रे सांगून घडवले आहे. त्यामुळे लढण्याची प्रेरणा मिळते. जितेंद्र आव्हाड यांना मी उत्तर दिले; म्हणून त्यांनी माझी पाठ सोलून काढली; पण मी घाबरलो नाही, तर लढण्याचा निश्चय केला. यानंतर परिस्थितीशी लढत राहून आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांना अटक करण्यास भाग पाडले. यामागे देशासाठी काम केलेल्या सर्व महापुरुषांचीच प्रेरणा आहे, असे मत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मुंबई येथील धारकरी श्री. अनंत करमुसे यांनी व्यक्त केले. येथील थोर क्रांतीकारक, गोवा मुक्ती संग्रामातील अग्रणी, क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी श्री. अनंत करमुसे यांना ‘क्रांतीवीर वसंतदादा बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

१. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदु महासभेचे प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल पवार होेते, तर आशीर्वाद देण्यासाठी ह.भ.प. ओंकार संतोष बाबा, वडगावकर महाराज, ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, हार, मानपत्र आणि ११ सहस्र रुपये रोख, असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी श्री. अनंत करमुसे यांच्या पत्नी सौ. निवेदिता करमुसे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विवेक बेणारे यांनी केले, तर श्री. मयुर बडवे यांनी आभार मानले.

२. या वेळी हिंदु महासभेचे ज्येष्ठ नेते श्री. अनिलकाका बडवे, सर्वश्री अभयसिंह इचगावकर, विवेक बेणारे, बाळासाहेब डिंगरे, प्रशांत खंडागळे, दीपक कुलकर्णी, शाम हिवरकर, गणेश लंके, मयुर बडवे, श्रीराम बडवे, महेश खिस्ते, तुकाराम चिंचणीकर, सौरभ थिटे पाटील यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.

३. ‘जे लोक हिंदुत्वाचे कार्य मनापासून करतात, त्यांना शौर्य पुरस्कार जणू श्री विठ्ठलाचा आशीर्वाद म्हणून प्रदान करण्यात येतो’, अशी पुरस्कार देण्यामागील भूमिका ‘क्रांतीवीर वसंत दादा बडवे ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. अभयसिंह इचगावकर यांनी स्पष्ट केली. याआधीही दैनिक ‘सनातन प्रभात’, श्री. मिलिंद एकबोटे, संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर, हिरामण अप्पा गवळी, विकास सूर्यवंश, समीर दरेकर, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक, तसेच चंद्रकांत सहासने, शिवशंकर स्वामी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, संजय साळुंखे, गोरक्षक सुधाकर बहिरवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

४. या वेळी अभयसिंह इचगावकर म्हणाले, ‘‘अनंत करमुसे यांनी सामाजिक माध्यमांवर मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्याने स्वत:च्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली होती. या प्रकरणी करमुसे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने मंत्री आव्हाड यांना अटक करण्याचा आदेश दिल्यानंतर आव्हाड यांना अटक झाली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणामध्ये करमुसे यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले होते. हिंदुत्वाचे काम करतांना त्यामध्ये अडथळे येतात; मात्र मनापासून हिंदुत्वाचे कार्य केल्यास यश लाभते हेच यातून सिद्ध होते.’’

विशेष

१. कार्यक्रमाच्या वेळी श्री. तुकाराम चिंचणीकर यांनी ‘वन्दे मातरम्’ गीत सादर केले.

२. या प्रसंगी मूलतः कॅथोलिक गोवेनिज ख्रिस्ती असूनही श्री विठ्ठल भक्तीमुळे ३५ वर्षांपूर्वी हिंदु धर्म स्वीकारलेले आणि दीनदलित वर्गात हिंदुत्वाची पताका सदैव तेवत ठेवणारे ह.भ.प. ओंकार बाबा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.