नैतिकता हरवलेल्या सैन्य अधिकार्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, तरच इतरांवर जरब बसेल !
पुणे – येथील ‘मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल’मध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी एका ब्रिगेडियरने अनैतिक संबंध ठेवले. त्याने महिलेची अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ (चलचित्र) बनवून ते प्रसारित करण्याची धमकी दिल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी वरिष्ठ सैन्य अधिकारी ब्रिगेडियर अजित मिलू यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. ही घटना वानवडी येथील ‘ऑफिसर मेस’मध्ये १३ ऑक्टोबर या दिवशी घडली. महिलेचे पती जयपूर येथे सैन्यात असून ते पुण्यात आल्यावर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला आहे. ब्रिगेडियर अजित मिलू यांनी लेफ्टनंट कर्नल महिलेच्या एकटेपणाचा अपलाभ घेऊन तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. तिला लग्नाचे वचन देऊन तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले. अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ बनवून ते प्रसारित करून अपकीर्ती करण्याची धमकी दिली. त्यांच्या धमक्यांना घाबरून महिलेने आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक साळगावकर या घटनेचे अधिक अन्वेषण करत आहेत.