‘बृहद्भारत म्हणजे वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली असलेले आग्नेय अशियातील म्हणजे अतीपूर्वेकडील देश. त्यांनाच ‘बृहत्तर भारत’ असे म्हणतात. यामध्ये कंबोडिया किंवा कंबुन अथवा कांपुचिया, ब्रह्मदेश, मलाया, जावा-सुमात्रा, वाली, सयाम, लाओस, बोर्निओ इतक्या देशांचा समावेश करता येईल. वाली म्हणजे इंडोनेशिया आणि सयाम हाच थायलंड. या सर्व देशांवर चातुर्वर्ण्यांची पूर्ण छटा होती. तसा प्राचीन पुरावा आहे. बृहद्भारत म्हणजे हिंदु साम्राज्याचा विस्तारच. पुराणात तर मलाया द्वीपकल्पाचा ‘सुवर्णद्वीप’ असा निःसंदिग्ध निर्देश आहे. इंडोनेशिया म्हणजे जावा, सुमात्रा. इथे तर लोकजीवनाचे एकही अंग नाही की, ज्यावर भारतीय संस्कार झालेले नाहीत. त्या ठिकाणी हिंदु राजे होते. बलितुंग हा वैभवशाली शैवपंथी राजा, दक्षोत्तम, असे हे हिंदु राजे सूर्यासारखे तेजस्वी होते.
बृहद्भारतात धर्मवंश, श्रीविजयचा शैलेंद्र, कामेश्वर, कृतजय, जयविष्णुवर्धन, जयभद्र, कृतवर्धन, विष्णुवर्धन, उग्रसेन बर्मदेव असे एकापेक्षा एक सरस हिंदु राजे होऊन गेले आहेत. कंबोडियाचा संस्थापक कौंडिण्य हा ब्राह्मण होता. बोर्निओत राजमलवर्मन याने ‘बहुसुवर्णक’ हा महायज्ञ केला होता. त्या यज्ञात त्याने ब्राह्मणांना ४० सहस्र गायींचे दान दिले. सयाममध्ये हिंदु राजे होऊन गेले आहेत. थाई राज्य हे तर हिंदु संस्कृतीचे साम्राज्य होते. असे आग्नेय आशियातील सर्व भूप्रदेशात हिंदूचे राज्य होते. हिंदु धर्म आणि संस्कृती होती.
वाली बेट
वाली देशाचे राजे आणि जनता ६ व्या शतकापासून आजपर्यंत हिंदु धर्मीय आहेत. प्रजा शैवपंथी आहे. बौद्ध धर्म इथे आला; पण तो टिकला नाही. बुद्धही शिवाचेच उपासक आहेत. येथे शिवाचे विलक्षण महत्त्व आहे. जावा आणि वाली देशात सगळे हिंदु विधी होतात. आज वाली बेटात संस्कृत भाषेत प्रार्थना आहेत. आजही वाली बेटात सूर्यपूजा करतांना सप्तनद्यांचे स्मरण करतात. घंटा वाजवून मंत्रघोष करतात. त्रिमूर्तींचे (ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे) स्मरण करून प्रार्थना करतात. गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप अशा उपचारांनी पूजन करतात. यज्ञोपवीत धारण करतात. जपाकरता १०८ मण्यांची अक्षमाला वापरतात.
जावा
जावा-सुमात्रा देशात बहुसंख्य लोक हिंदु धर्मीय होते. हिंदु त्रिमूर्तींचे वर्णन आणि त्यांची शिल्पे ठिकठिकाणी आहेत. शिव आणि शिव कुटुंबाची शिल्पे आहेत. अर्धनारीश्वर मूर्ती आहेत. शिवलिंगाची पूजा सर्वत्र चालू होती. जावा-सुमात्रात हिंदु धर्म आणि हिंदु धार्मिक विधी सर्व सामान्यांपर्यंत पोचले होते. जावामध्ये गुणत्रिय राजा होता. त्याच्यानंतर त्याची धर्मपत्नी गादीवर होती. राजाकडून नजराणा (भेट) मिळण्याच्या प्रसंगी त्याच्यासमवेत पत्नीलाही नजराणा मिळायचा, तसेच क्षत्रियांच्या स्वयंवराचे निर्देश आढळतात. बृहद्भारतात विशेषतः चंपा आणि कंबुन देशांत विवाहपद्धत संपूर्णपणे हिंदूंच्या पद्धतीसारखी होती. मंगळसूत्र, कर्णकुंडले, बांगड्या, गळ्यातील हार, पैंजण, कमरपट्टा, अंगठी असे. हिंदु स्त्रियांसारखेच स्त्रियांचे अलंकार असत. मृतदेहांवर हिंदु परंपरेनुसार अग्नीसंस्कार करण्यात येत असे.
जावातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथ आणि महाकाव्ये
जावातील ‘अमरमाला’ हा सर्वाधिक प्राचीन संस्कृत ग्रंथ आहे. संस्कृतच्या अमरकोशाच्या आधारानेच हा ग्रंथ सिद्ध झालेला आहे. यात देवतांची विविध नावे आहेत. येथील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ ‘रामायण.’ वाल्मीकि ऋषींचे हे रामायण आहे. केडिरीच्या राज्यकाळात पुष्कळसे संस्कृत वाङ्मय निर्माण झाले. ‘स्मरदहन’ हे अमरकाव्य. नंतर जयभद्राच्या कार्यकाळातील भारतयुद्ध’ नंतर ‘घटोत्कचवध’ हे महाकाव्य. भारतयुद्धाची नवी आवृत्ती ‘व्रतजुद’ या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. पुढे ‘वृत्तसंचय’ हे काव्य झाले. यात छंदाविषयीचे नियम आहेत. कामेश्वराच्या काळातील दुसरे काव्य हे ‘भीमकाव्य.’ यांत इंद्र आणि भीम यांचे युद्ध आहे. आता नवी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. ‘ककविन’ हे महाकाव्य प्राचीन आहे. त्यांत श्रीकृष्णाचा अंत आणि यादव कुळाची इतिश्री आहे. मजपहित काळात बौद्ध धर्मीय परंपरेनुसार ‘यति अर्जुनविजय’ हे काव्य लिहिले गेले. हे संस्कृत काव्य आहे. हिंदु आणि बौद्ध हे कसे एकरूप झाले होते, हे यात आहे. तिथल्या भाषेत त्यांची अनेक काव्ये भारतातील महाभारतावर आधारलेली आहेत.
जावामध्ये इंद्रविजय, पार्थयज्ञ, विघ्नोत्सव, हरिश्रय, हरिविजय ही काव्ये झाली आहेत. हरिविजयमध्ये अमृतमंथनाची कथा आहे. कालयवनान्तकाची कथा विष्णुपुराणातील आहे. ‘कंसाच्या मृत्यूचा सूड घ्यावा म्हणून कालयवन द्वारकेत जातो’, अशी ती कथा आहे. ‘रामविजय’ या महाकाव्यात परशुरामाने सहस्रबाहू अर्जुनाचा पराभव केल्याची कथा आहे. पार्थविजयचे कथानक महाभारतातीलच आहे. ‘अगस्ति पर्व’ हे आणखी एक महाकाव्य आहे. त्यात हिंदु देवतांची नावे आहेत. इंद्र, अग्नी, वायु, यम, चंद्र, बृहस्पति प्रजापति अशा नाना देवतांची नावे कृत्तिवास आणि ‘चतकपर्व’ आदि कोशातून आलेली आहेत. जावांत शैलेंद्र या हिंदु राजाच्या काळात हिंदु धर्म आणि संस्कृती उत्कर्षावस्थेत होती.
जावामधील प्राचीन काव्ये
शैलेंद्राचा काळ म्हणजे हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्या उत्कर्षाचा काळ. शतशः हिंदु मंदिरे इथे त्या काळी उभी झाली. तेथील प्रासवानाजवळ शिवमंदिर असून तेथे रामायणातील अनेक प्रसंग उत्कृष्ट चित्रित केले आहेत.’’ रामायणातील विशेषतः सुंदरकांड आणि अयोध्याकांड यांची चित्रे मन वेधून घेत होती. जावामधील रामाच्या हिंदु देवालयाचे स्थापत्य आणि कलाकुसर अत्यंत श्रेष्ठ आहे. जावा, सुमात्रा, बोर्निओ, सेलेबीझ, मलाया, इंडोचायना असे सर्वत्र हे वाङ्मय विलक्षण लोकप्रिय झाले. मलायातील वाङ्मयात लव-कुश, सीतेचे अग्नीदिव्य, जटायूचा वध, अशा पुराणकथा आहेत. ‘पांडव सीमा’, ‘पांडव जय’ अशी काव्येही आहेत. मलायातील प्रेमकाव्याच्या नायकांची नावे हिंदूंचीच आहेत. हितोपदेश पंचतंत्र यावर आधारित ‘तंगीकेडीरी’, ‘तंगीडेमुंग’ ही काव्येही सर्वत्र विलक्षण लोकप्रिय आहेत. जावा देशात धर्मवंशाचे कायदे हिंदु स्मृतीप्रमाणे केले. महाभारत आणि अनेक संस्कृत ग्रंथाचा स्थानिक तीन भाषेत अनुवाद करवून घेतला. धर्मवंशाचा जावई ऐरलंग्गा. तो राजा होता. त्याच्या काळात तर वैदिक वाङ्मय आणि वैदिक शिल्पांना विलक्षण बहर आला होता. त्यामुळे त्याचे नाव चिरस्मरणीय झाले. राजकवी मधुकण्वाचे ‘अर्जुनविवाह’ हे महाकाव्य प्रसिद्ध आहे. त्यातला अर्जुन म्हणजे स्वतः ऐरलंग्गा आणि सुभद्रा ही श्रीविजयची राजकन्या. या दोघांचा विवाह ही या काव्याची कथा आणि पार्श्वभूमी ! आजही जावात तेच बायांग म्हणजे छायानाट्य होते.’
(साभार : मासिक, ‘घनगर्जित’ मे २०२१)